मनपा शाळांमधील २ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप…
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि चंद्रनील सोशल फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज
सोलापूर, दि.१३ जून
सोलापूर महानगरपालिकेच्या शाळांसह इतर शाळांमध्ये शिकणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या तब्बल २ हजार विद्यार्थ्यांना दप्तर आणि इतर शालेय साहित्य वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि चंद्रानील सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झाला. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष आणि चंद्रानील सोशल फाउंडेशनचे संस्थापक सी. ए. सुशील बंदपट्टे यांच्या पुढाकारातून हुतात्मा स्मृती मंदिरात गुरुवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत दगावलेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिवादन करून आणि दीपप्रज्वलन करून झाले. याप्रसंगी व्यासपीठावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, माजी नगरसेवक विनोद भोसले, काँग्रेसचे प्रवक्ते प्रा. अशोक निबंर्गी, श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ उत्सव अध्यक्ष आणि संयोजक सी.ए. सुशील बंदपट्टे, भाजपाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील, सुनील रसाळे, श्रीकांत घाडगे, संभाजी आरामाचे संस्थापक श्रीकांत डांगे, सुभाष पवार, काँग्रेसचे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, मतीन बागवान, विश्वनाथ गायकवाड, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, हेमा चिंचोळकर, राजाभाऊ कलकेरी, दिपक जाधव, महेश अलकुंटे, ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ यमपुरे, अशोक यमपुरे, शाम मुद्दे, संतोष इरकल, दत्तात्रय अलकुंटे, गोपाळ पाथरूट, श्रीनिवास यमपुरे, संदीप म्हेत्रे, सुरज कनुरे, गोविंद यमपुरे, लक्ष्मण अलकुंटे, जयवंत यमपुरे, गणेश कुलकर्णी उपस्थित होते.
याप्रसंगी दोन हजार परिवारातील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर आणि इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने सी.ए. सुशील बंदपट्टे राबवित असलेला शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. यातून विद्यार्थ्यांना नक्की प्रेरणा मिळेल. भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या, प्रत्येक घरातील मुले – मुली शिकल्या पाहिजेत. शिक्षणात संस्कार आणि सन्मानाचा पाया आहे. घरातील एक व्यक्ती शिकली तर संपूर्ण कुटुंबाची स्थिती सुधारते. त्यामुळे सी. ए. सुशील बंदपट्टे यांनी राबवलेला उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला उपयोगी ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरात म्हणाले सी.ए. सुशील बंदपट्टे यांनी शालेय साहित्य वाटपाचा अत्यंत चांगला उपक्रम राबविला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व पक्षांनी सी.
ए. सुशील बंदपट्टे यांना बिनविरोध निवडून द्यावे. त्यांच्या या कामामुळे सोलापुरात शिक्षणासाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे.
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष आणि चंद्रानील सोशल फाउंडेशनचे संस्थापक सी. ए. सुशील बंदपट्टे यांनी प्रास्ताविक केले. मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचालन तर राजा कलकेरी यांनी आभार प्रदर्शन केले.
वडिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी उपक्रम
माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांना शिक्षणाबद्दल अत्यंत आपुलकी होती. अतिशय खडतर परिस्थितीत स्वतःचा भविष्य निर्वाह निधी खर्च करून त्यांनी आम्हा भावंडांचे शिक्षण पूर्ण केले. समाजातील गोरगरीब घरातील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी दरवर्षी चंद्रनील सोशल फाउंडेशनकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते, असे चंद्रनील सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संयोजक सी.ए. सुशील बंदपट्टे यांनी याप्रसंगी सांगितले.