श्रीसत्यात्मतीर्थ स्वामीजींच्या हस्ते श्री मूलरामाची महापूजा भक्तीमय वातावरणात संपन्न…
मुद्राधारण, सामूहिक पाद्यपूजेसाठी उसळली भाविकांची गर्दी
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २७ – उत्तराधीमठ पीठाधीपती श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांच्या हस्ते शनिवारी श्री मूलरामाची महापूजा भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी रात्री सोलापुरात विजयपूर रस्त्यावरील पाटील नगर येथील डॉ. एस. डी. गोटे यांच्या निवासस्थानी श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांचे आगमन झाले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
शनिवारी सकाळी ‘श्रीमन न्यायसुधा’ चा पाठ स्वामीजींनी करवला. यानंतर विजयपूर रस्त्यावरील कोर्ट कॉलनी येथील मनोजकुमार देसाई यांच्या निवासस्थानी प्रारंभी सकाळी आठ वाजता सामूहिक पाद्यपूजा आणि मुद्राधारण कार्यक्रम झाला. यावेळी हजारो भाविकांनी उत्तराधीमठ पीठाधीपती श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांच्याकडून मुद्रा घेतली. यानंतर सकाळी ११.३० वाजता श्रीमूलरामाच्या महापूजेस प्रारंभ झाला. हजारो वर्षांपूर्वीची अतिप्राचीन असलेली आणि श्री ब्रह्मदेव व श्री मध्वाचार्यांनी पूजलेल्या श्री मूलरामचंद्रांच्या चतुर्युग मूर्तीचे तसेच मध्वाचार्यांच्या संस्थान प्रतिमांची पूजा श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांनी केली.
या पूजेचे यजमानपद मनोजकुमार देसाई यांनी भूषविले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत अतिशय भक्तीमय वातावरणात ही पूजा करण्यात आली. दुपारी भाविकांना तीर्थ व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी विश्व मध्व महापरिषदेचे अध्यक्ष बी. जी. कुलकर्णी, डॉ. एस डी. गोटे, व्ही. जी. जोशी, अनिल खवासखान, पी. बी. सुरटूर, जयतीर्थ पडगानुर, युवक संघटनेचे तसेच महिला मंडळाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.