श्रीरूपाभवानी देवीला हजारो भक्तांची रीघ ! घुमला उदोsss उदोsss चा जयघोष…
पालेभाज्यांच्या आरासात मंदिर बनले हिरवे गर्द…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ९ ऑक्टोंबर – सोलापूरची कुलस्वामिनी ग्रामदेवी श्रीरूपाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवात बुधवार (दि.९) ऑक्टोंबर रोजी सातव्या माळेला श्रीरूपाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने हिरव्या केळी, ढब्बू मिरची, बटाटा, मेथी, पालक, शेपू, वांगे, काकडी, भेंडी, फ्लावर, भोपळा, पोवळा, टोमॅटो असे विविध ११ प्रकारच्या फळभाज्या आणि हिरव्या पालेभाज्यांची आरास करण्यात आली होती. सदरची आरास केल्यामुळे देवी मातेचा गर्भगाभारा हिरवा गर्द दिसून आला. सकाळी नित्योपचार पूजा, आरती झाल्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून देवीचा गाभारा देवी भक्तांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला. यावेळी देवीच्या रूपाचे दिवसभर असंख्य अबालवृद्ध भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
दरम्यान पार्वतीचे रूप म्हणजे श्री रुपाभवानी देवी. देवीचे हे रूप अत्यंत मनमोहक आहे. बुधवारी, पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम, नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजा झाल्यानंतर महापूजा करण्यात आली. दररोज नियमित रुपाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधिवत पार पाडले जात आहेत. १० ऑक्टोबर रोजी अस्टमी व नवमी एकाच दिवशी आले आहे. यादिवशी श्री देवीची अलंकार पूजा आणि संध्याकाळी होमहवन होऊन रात्री नित्योपचार पूजा व छबिना होणार असल्याचे ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे यांनी सांगितले..
उद्या श्रीरूपाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध १५ प्रकारच्या कडधान्याची असणार आरास…
सोलापूरची ग्रामदेवी श्रीरूपाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, नित्योपचार पूजा आणि अभिषेक संपन्न केले जात आहेत. त्यानंतर देवीच्या गर्भगाभाऱ्यात विविध प्रकारची आरास केली जात आहे. त्यानुसार आज विविध १५ प्रकारच्या कडधान्याची आरास करण्यात येणार आहे.