येळकोट येळकोट जय मल्हार जयघोष अन् उधळला एकच भंडारा……!
यात्रेच्या पहिल्या रविवारी श्रीक्षेत्र बाळे खंडोबा मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.८ डिसेंबर
तीर्थक्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा देवस्थान येथे मार्गशीर्ष महिन्यात श्रींच्या यात्रेचा अभूतपूर्व सोहळा संपन्न होत आहे. धार्मिक महिना म्हणून मार्गशीष महिन्याकडे पाहिले जाते. या महिन्यात श्री मार्तंड भैरव अर्थात खंडोबा आणि श्री महालक्ष्मीचे प्रतिरूप वैभव लक्ष्मीचे व्रत संपन्न केले जाते. त्या अनुषंगाने या मार्गशीष मासास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला रविवार असल्याने, आज श्रीक्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा मंदिरात भाविकांची श्रींचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी दिसून आली. पहाटे विविध धार्मिक कार्यक्रम आणि महापूजा संपन्न झाल्यानंतर सकाळी मंदिर आणि श्रींचा गर्भ गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. यावेळी आबालवृद्ध भाविकांनी आपल्या हातामध्ये भंडारा उधळून येळकोट…… येळकोट ……जय मल्हार सदानंदाचा येळकोट….असा एकच जयघोष केला.
दरम्यान, श्री क्षेत्र बाळे श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही यात्रेचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दर्शन रांगा तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुखदर्शन आणि धर्मदर्शन अशा दोन रांगा करण्यात येऊन भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेराची करडी नजर तैनात आहे. त्याच पद्धतीने पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी मंदिर समिती आणि प्रशासन एकत्रितरीत्या कामकाज करत आहे. संपूर्ण महिनाभर यात्रा सुरू राहणार असल्याने, यात्रेच्या दिवशी म्हणजेच रविवारी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता. सुरक्षितता आणि दर्शन रांगा यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने मंदिर परिसरात विविध प्रकारचे त्रास अधिक साहित्य आणि खेळण्याचे स्टॉल्स थाटण्यात आले असून, विविध साहित्य घेण्यासाठी भाविकांची स्टॉल्सवर गर्दी दिसून येत आहे. भाविक भक्तांनी सोबत आणलेला नैवेद्य अर्पण करण्यासाठी देखील मंदिर परिसरात गर्दी होती. भरीत-रोडगा,पुरणपोळी, आणि बाजरीचे पीठ असे नैवेद्य श्रींना अर्पण करून पोटंबा भरण्यात आला. भंडारा उधळत येळकोट जयघोष करण्यात आला. सोलापूर शहर जिल्ह्यासह मराठवाडा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक भक्त मंदिर परिसरात श्रींचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच रांगेत उभे होते.
मार्गशीर्ष महिन्यात अनन्यसाधारण असे महत्त्व
यात्रेच्या पहिल्या रविवारी पहाटे पाच वाजता काकड आरती, सकाळी आठ वाजता महापूजा संपन्न करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर दिवसभर जागरण गोंधळ, जावळ काढणे, कार्यक्रम संपन्न झाले. संध्याकाळी आठ वाजता महापूजा त्यानंतर रात्री गावप्रदक्षिणा पालखी पूजा छबिना धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. मार्गशीष महिन्यात भाविकांची अलोट गर्दी असते. या महिन्याला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
गणेश पुजारी, मंदिराचे पुजारी व मानकरी.