पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे विधिवत विसर्जन…
धर्मवीर संभाजी तलाव येथे गणेश भक्तांनी बाप्पांना दिला निरोप….

प्रतीनिधी / सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर , दि. ११ सप्टेंबर – गणपती बाप्पा मोरया……. पुढच्या वर्षी लवकर या…… या जयघोषात चिमुकल्या बालगोपाळांनी बाप्पाची आरती करून पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना जड अंत:करणाने निरोप दिला. धर्मवीर संभाजी तलाव येथे महापालिकेच्या वतीने कृत्रिम विसर्जन कुंडांमध्ये बापांचे विधिवत आणि परंपरेनुसार विसर्जन करण्यात आले. यावेळी सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान गौराईचे आगमन झाल्यानंतर पाच दिवसांच्या गणपतींनी गणेश भक्तांचा आणि गौराईचा निरोप घेतला. यावेळी आपल्या परंपरेनुसार भाविकांनी पाच दिवसांच्या गणपतींना साश्रू नयनांनी निरोप दिला. पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी शहरातील विविध विसर्जन कुंडांवर भाविकांची गर्दी वाढली होती. त्या अनुषंगाने शहरातील विविध विसर्जन स्थळांवर प्रशासनाच्या वतीने सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या.
निर्माल्य संकलन तसेच स्वच्छता राखण्यासाठी काही कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. तसेच गणपती बाप्पांची मूर्ती कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये विसर्जित करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्याच पद्धतीने मोठ्या गणेशमूर्तींच्या संकलनासाठी एक पथक तयार करण्यात आले होते. सदरच्या मोठ्या मूर्ती संकलित करून त्या तुळजापूर रोडवरील खणीमध्ये विसर्जित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे.
महापालिका प्रशासनाकडून धर्मवीर संभाजी तलाव येथे कृत्रिम विसर्जन कुंड निर्माण करण्यात आला आहे. त्या कुंडांमध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन केले जात आहे. त्याच अनुषंगाने महापालिका प्रशासनाकडून योग्य त्या सुविधा निर्माण करण्यात आले आहेत. बाप्पांचे विधिवत आणि परंपरेनुसार विसर्जन व्हावे यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने कोणतेही धार्मिक भावना दुखावली जाऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असून निर्माल्य संकलन करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
– बाबर , झोन अधिकारी, सोलापूर महानगरपालिका सोलापूर.
विसर्जन कुंडातील पाणी बदलावे…
महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडातील पाणी गढूळ होत आहे. अशा पाण्यामध्ये गणपती बाप्पा विसर्जन करणे योग्य वाटत नाही. प्रशासनाने अस्वच्छ पाणी बदलून स्वच्छ पाणी टाकावे जेणेकरून भक्तांमध्ये नाराजी पसरणार नाही.
– अभिजित बेल्हेकर, गणेशभक्त