भक्तांच्या घरोघरी झाले गौराईचे विधिवत पूजन..…
विविध देखाव्यातून गौरी गणपतीचा सण साजरा !
प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर , दि. ११ सप्टेंबर – आनंदाचा , उत्साहाचा आणि नवचैतन्याचा गौराईचा सण सोलापूर शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. मंगळवार ( दी. १० ) सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता गौराईसह पिलवंडाचे भक्तांच्या घरोघरी आगमन झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली. आकर्षक सजावट आणि विविध प्रकारच्या देखाव्यातून गौराई सजवली होती. दुपारी बारा वाजता पूजा आणि धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर गौरीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. सुवासिनी महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला.
दरम्यान सुवासिनी महिलांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर गौराईचा देखावा भक्तांसाठी खुला करण्यात आला.
शहरातील विविध ठिकाणी गौराई समोर हलते देखावे साकारण्यात आले होते. त्याच पद्धतीने सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशातून जितेंद्र महामुनी परिवाराकडून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंपासून देखावा साकारण्यात आला होता. वाचाल तर वाचाल , योग , सर्वधर्मसमभाव , वृक्षवल्ली आम्हा सोयरे , अशा विविध विषयातून सामाजिक संदेश देण्यात आला. तर विठ्ठल खुने परिवाराकडून श्री पांडुरंगाचे रिंगण सोहळे खालत्या देखाव्यातून सादर करण्यात आले.



तसेच अशोक तळीखेडे परिवाराकडून बालाजी आणि पद्मनाभ मंदिर देखावा साकारण्यात आला होता. गौरीस आकर्षक अलंकार आणि वस्त्र परिधान करण्यात आल्याने देखावा उत्कृष्ट दिसत होता. त्याचप्रमाणे नागेश सोलनकर परिवाराकडून देखील वैविध्यपूर्ण असा सीताहरण हलता देखाव्याच्या माध्यमातून निर्माण करण्यात आला होता. हुबेहूब सीताहरण कथा या देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आली होती. गौरी गणपतीच्या सणाला येणाऱ्या माहेरवाशीन गौरीचे थाटामाटात पूजन करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला. यावेळी भक्तांच्या घरोघरी चैतन्यमय तसेच आनंदमय वातावरण पसरले होते.

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्माण करून त्या साहाय्याने देखावा सादर केला.
दरवर्षी गौराईचे विधिवत आगमन होते. दुसऱ्या दिवशी गौराई आपल्या पिळवंडांसह भक्तांच्या घरोघरी विराजित होते. आज गौराई ते पूजन मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाले. दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम घेऊन संदेश दिला जातो. यावर्षी देखील विविध ज्वलंत विषय घेऊन सामाजिक संदेश देण्यात आला. आजची पिढी मोबाईलमध्ये गुंतली असून, त्यांनी वाचनाकडे लक्ष द्यावे, वाचाल तर वाचाल अशा पद्धतीने देखावा सादर केला. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्माण करून त्या साहाय्याने देखावा सादर केला आहे.
– मीरा महामुनी महिला भाविक.