श्री वीरतपस्वी आत्मज्योत व रथोत्सव यात्रा भक्तिभावाने संपन्न ! सर्वत्र पसरले भक्तीचे अनोखे संगम …
काशी जगद्गुरूंची बाळीवेस ते होटगी भक्तासमवेत पदयात्रा
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.६ फेब्रुवारी
श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ६९ व्यां पुण्यतिथी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील मोठ्या प्रसन्नतेने व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. गुरुवार (दि.६) फेब्रुवारी रोजी पहाटे २.१० मि. उत्तर कसबा येथील होटगी मठात चिटगुप्पाचे गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते आत्मज्योत प्रज्वलित करून वीर तपस्वीजींना श्रद्धांजली समर्पण करण्यात आली. यावेळी वडांगळीचे पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, मागणगिरीचे विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी व चिटगुप्पाचे उत्तरा धिकारी शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती. तदनंतर पहाटे ५.३० वा. बृहन्मठाचे अध्यक्ष चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या शिरावर श्री वीरतपस्वी आत्मज्योत धारण केले.
यावेळी उपस्थित भाविकांनी श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराज की जय, तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज की जय च्या घोषणा दिल्या. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचा सर्वात पुढे ट्रॅक्टरवर श्री वीरतपस्वीजींची प्रतिमा, हलगी, बँड, विविध गावचे पुरवंत श्री वीरतपस्वी यांची पालखी, विद्यार्थ्यांचे पथक, बैलजोडी व रथ यासह ही मिरवणूक मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस, चाटी गल्ली, मंगळवार पेठ, मधला मारुती, विजापूर वेस, गुरुभेट ,सात रस्ता, गांधीनगर,होटगी नाका, मजरेवाडी यापारंपारिक मार्गाने ही मिरवणूक निघाली.
दरम्यान, मिरवणूक मजरेवाडी( विसावा )येथे आल्यानंतर मजरेवाडीतील सुवासिनी डोक्यावर जलकुंभ आणून भक्तीभावाने आत्मज्योतीचे स्वागत केले .मिरवणुकीच्या वाटेवर ठिकठिकाणी भक्तानी रांगोळीच्या व फुलांच्या पायघड्या घालून मिरवणुकीचे स्वागत करीत होते व आत्मज्योत आपल्या शिरावर घेत होते .मिरवणूक होटगी येथे पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी ज्योतीचे स्वागत करून गावातून भव्य मिरवणूक काढली.मठात आत्मज्योतीचे आगमन झाल्यानंतर महामंगलारती होऊन श्री वीरतपस्वी आत्मज्योत पदयात्रेची सांगता करण्यात आली.यावेळी शिवाचार्यांच्या उपस्थितीमध्ये धर्मसभा झाली. सायंकाळी ४.०० वा. रथोत्सव कार्यक्रम पार पाडला. भक्तानी पदयात्रेत विविध ठिकाणी भाविकांना प्रसादाचे वाटप केले.
या मिरवणुकीत नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, शिखर शिंगणापूरचे सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी, सिद्धनकेरीचे राचोटेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, होटगी, बोरामणी, धोत्री, दर्गनहळी लिबिचिंचोळी, बोरेगाव, सातनदुधनी, मुस्ती, कुंभारी, खानापूर, सरसंबा येथील सदभक्त व संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक- मुख्याध्यापिका, शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. होटगी येथे सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
आत्मज्योतीचे भक्तीभावाने व उत्साह पूर्ण वातावरणात स्वागत
सोलापूर शहरातील बाळीवेस ते मौजे होटगी गावापर्यंत रथोत्सव मार्गावर भाविकांनी आत्मज्योतीचे भक्तीभावाने व उत्साह पूर्ण वातावरणात स्वागत केले. यावेळी श्री सिद्धेश्वर कारखान्याच्या वतीने उसाचा रस देण्यात आला. कला संगम फाउंडेशनच्या वतीने बाळीवेस ते गुरुभेट पर्यंत रांगोळीच्या सुंदर पायघड्या घालण्यात आल्या होत्या. यामध्ये रूपाली कुताटे, रूपाली भोगडे ,अश्विनी नागणसूरे, श्रावणी दर्गो पाटील, संध्या वैद्य, रक्षा रायकर, अविनाश जिंकेरी व त्यांच्या सहकार्यानी सुंदर रांगोळी काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संजय भोगडे व दासोह स्वामी यांनी प्रतिवर्षाप्रमाणे मिरवणुकीत भक्तांना गंध लावण्याचे काम केले. वीर तपस्वी स्काऊट पथक एमआयडीसीच्या विद्यार्थ्यांनी मिरवणूक मार्गावरील स्वच्छतेचे काम केले.