श्री सिद्धरामेश्वरांच्या ६८ लिंगांचे होणार जीर्णोध्दार ; विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी कोठेंना दिला २ कोटींचा निधी
शहर मध्यसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून पुन्हा १४ कोटींचा विशेष निधी

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२८ ऑक्टोबर
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या जिर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वपूर्ण कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. २०२४-२५ मध्ये तब्बल १२ कोटींचा निधी दिल्यानंतर आता २०२५-२६ च्या चालू बजेटमध्ये १४ कोटींचा निधी आमदार देवेंद्र कोठे यांना दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र कोठेंवर विशेष मर्जी असल्याचे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भक्कम साथ लाभत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

विधानसभेच्या अधिवेशना दरम्यान सोलापूर विकासाचे मुद्दे मांडत असताना आमदार देवेंद्र कोठे यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांचा परिसर विकसित करून पर्यटन विकासाला चालना देता येईल असा मुद्दा मांडला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांच्या बैठकीतही सुद्धा त्यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुध्दा कोठेंच्या मुद्द्यांवर सकारात्मकता दाखवत निधीसाठी पाठपुरावा केला. ६८ लिंगांचा परिसर विकसित करण्यासाठी ६ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची मागणी आ. कोठे यांनी केली होती.

त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात त्यांना दोन कोटींचा निधी देण्याचा अध्यादेश जारी केला आहे. याशिवाय शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी २०२५- २६ च्या अर्थसंकल्पातून विशेष निधी मंजूर झाला आहे. या आर्थिक वर्षात आमदार देवेंद्र कोठे यांना १४ कोटी रुपये निधी वितरणाचा महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश निघाला असून १२ कोटींच्या या निधीतून मतदारसंघातील ४५ प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. ६८ लिंगांचा विकास करत बाराव्या शतकातील योगी कुलचक्रवती सिद्धरामेश्वर यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न आमदार कोठे यांच्याकडून होत असल्याने शहर जिल्ह्यातील सिद्धरामेश्वर भक्तांकडून कौतुक होत आहे.

चोहोबाजूंनी तलावाने वेढलेले सिद्धरामेश्वर मंदिर परिसर वैशिष्ट्यपूर्ण असून केवळ मंदिर परिसराचा विकास न करता सिद्धरामेश्वरांचे कार्य आणि त्यांनी निर्माण केलेल्या ६८ लिं परिसराचाही विकास करावा हा संकल्प मनात होता. याकरिता पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपये मंजूर करतानाच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मला चालू वर्षांच्या बजेटमध्येसुद्धा १४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी माझे पालकत्व स्वीकारल्यामुळे सिध्दरामेश्वरांच्या कृपेने शहर विकासाचे आणखी इतरही अनेक मुद्दे मार्गी लावू शकेन याची खात्री वाटते.
– आ. देवेंद्र कोठे शहर मध्य विधानसभा, सोलापूर