आघाडीचा धर्म पाळा उद्धव ठाकरे यांचे खडेबोल !
काँग्रेसचे नेते भेटले उद्धव ठाकरे यांना म्हणाले ; दक्षिणला उमेदवार न देऊन आघाडी धर्म पाळला…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. १२ नोव्हेंबर –
विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि काँग्रेस यांच्यात वाद झाला. त्या वादाचे परिणाम आघाडीवर झालेले दिसून आले. काँग्रेसने जरी आपला उमेदवार मागे घेतला असला तरी, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना छुपा पाठिंबा देत, प्रचार सुरू केला आहे. अशी कुणकुण उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांना लागल्यानंतर, आघाडीत बिघाडी करू नये, असे उद्धव ठाकरे यांनी सांगत काँग्रेसच्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.
दरम्यान या घटनेनंतर सोलापूर दक्षिणमधून काँग्रेसकडून एबी फॉर्म आला होता, पण आम्ही तो उमेदवाराला दिला नाही. महाविकास आघाडीचा जो निर्णय झाला, त्याप्रमाणे आघाडीचा धर्म पाळला आहे. निवडणूक प्रचारातही आम्ही तो पाळू, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना बालाजी सरोवर येथे भेटून सांगितले.
तत्पूर्वी रविवारी झालेल्या सभेत ठाकरे यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांना आधाडी धर्म पाळण्याचे आवाहन केले होते.
महाविकास आघाडीत सोलापूर दक्षिण मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. तिथे त्यांनी अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने येथे उमेदवार दिला नसला तरी काँग्रेसचे नेते अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना आवाहन केले होते.काँग्रेसने सोलापूर दक्षिण मतदारसंघात उमेदवार दिलेला नसला तरी, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह दक्षिणमधील बहुतांश काँग्रेस नेते अपक्ष उमेदवार काडादी यांच्या प्रचारात गुंतलेले दिसत आहेत.
दरम्यान काँग्रेस पक्ष नेत्यांनी अमर पाटील यांच्या प्रचाराकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत सभेसाठी आल्याचा हवाला देत आवाहन केले होते. सोलापुरात मुक्कामी असलेल्या ठाकरेंना सकाळीच काँग्रेस नेते भेटले. यात शहराध्यक्ष तथा शहर मध्यचे उमेदवार चेतन नरोटे, पंढरपूरचे भगिरथ भालके आदींची उपस्थिती होती.
याबाबत काहीही चर्चा नाही, कोकीळ यांचा दावा
काँग्रेस नेत्यांची उध्दव ठाकरेंबरोबर कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांची बैठक किंवा भेट झाली नाही. काँग्रेसचे नेते काय करीत आहेत ? प्रचारात का उतरत नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अनिल कोकीळ, शिवसेना संपर्क प्रमुख, सोलापूर.
उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सोलापुरात आल्यानंतर त्यांची भेट घेणे गरजेचे होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी येथे आलो होतो.
चेटन नरोटे, शहराध्यक्ष काँग्रेस तथा शहर मध्य उमेदवार.