शहर मध्य साठी प्रा.शिवाजी सावंत महायुतीकडून प्रबळ दावेदार….
पंढरपुरातल्या सावंत यांच्या निवासस्थानी झाली चर्चा….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १५ जुलै – आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक लक्षात घेता आत्तापासूनच नेतेमंडळी उमेदवारासाठी आपापल्या गॉडफादरकडे फिल्डिंग लावताना दिसत आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी आघाडी तसेच महायुती यांच्याकडून आहे आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी अनेक नेते इच्छुक उमेदवार वरिष्ठ स्तरावरून प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.
महाविकास आघाडी कडून आडम मास्तर यांनी आत्तापासूनच चंग बांधला आहे. एम.आय.एम.कडून फारूक शाब्दि इच्छुक असल्याचे समजते. तर महायुतीकडून नेमके कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल याबाबत खलबते सुरू झाली आहेत. त्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यानंतर सुरू झाली आहे. सोमावरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पंढरपूर मधील आषाढी वारीच्या तयारीची पाहणी केली. दिवसभर पाहणी दौरा केला त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर दुपारी जेवणासाठी मंत्री तानाजी सावंत यांच्या बंगल्यावर दाखल झाले असता. विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत शहर मध्य मतदारसंघ शिवसेनेसाठी राखून ठेवावा आणि त्या जागेवर प्रा.शिवाजी सावंत यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
दरम्यान या विषयावर मुख्यमंत्र्यांशी साधक बाधक चर्चा झाली आहे. त्यावर लवकरच मूर्त स्वरूप येऊन शिक्कामोर्तब होईल आणि शहर मध्य शिवसेनेसाठी प्रा. शिवाजी सावंत यांना सोडला जाईल असे सांगण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गट शहर मध्य ह्या जागेसाठी आग्रही भूमिका घेत आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यासाठी विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. यापूर्वी देखील त्यांनी महायुतीमध्ये शहर मध्य मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी पुढाकार घेतला होता.
तर शहर मध्य मतदारसंघात होईल तिरंगी लढत..
शहर मध्य विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघातून प्रणिती शिंदे या तीन वेळा विधानसभेत गेल्या आहेत. त्या अगोदर आडम मास्तर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या ठिकाणी महाविकास आघाडी कडून आडम मास्तर , महायुतीकडून प्रा .शिवाजी सावंत तर एम.आय.एम कडून फारुक शाब्दी निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत त्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहर मध्य शिवसेनेची जागा
शहर मध्य ही जागा शिवसेनेची आहे त्यामुळे आम्ही आग्रही भूमिका घेत आहोत ही जागा शिवसेनेकडे राहावी. त्यासाठी प्रा. शिवाजी सावंत यांचे नाव सुचवण्यात आले असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील.
– अमोल शिंदे , जिल्हाप्रमुख शिवसेना शिंदे गट