एप्रिल किंवा मे महिन्यात बांधणार पक्षसंघटनात्मक मोट
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीच्या अनुषंगाने शाखाप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन :- सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांची माहिती…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ मार्च
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. एप्रिल किंवा मे महिन्यात त्यांचा दौरा सोलापूर शहरात संपन्न होणार आहे. त्याचा पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्या गाठीभेटी तसेच बैठकांचे सत्र सुरू केले आहे. त्या अनुषंगाने कोकीळ यांनी शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता, शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी पूर्व भागातील दाजीपेठ येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोलापूर दौऱ्यासंदर्भात माहिती दिली. तत्पूर्वी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सोलापूर शहर जिल्ह्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याच पद्धतीने दौऱ्या संदर्भात आढावा घेत पदाधिकाऱ्यांना शिबिरा बाबत माहिती दिली. तत्पूर्वी अनिल कोकीळ यांनी या शिबिरा बाबत माहिती देताना सांगितले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून या मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन केले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आणि गाव पातळीवर हे मार्गदर्शन शिबिर संपन्न होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका लक्षात घेता, शिवसेनेने मार्गदर्शन शिबिरातून पक्ष संघटन तसेच पक्ष मजबुतीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले.
महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ग्रामीण भागामध्ये घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा या संकल्पनातून शिवसेना कार्यरत राहणार आहे. यासंकल्पनेतून सच्चा शिवसैनिकांस महत्त्वाच्या पदावर नेमून जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी संघटनात्मक बैठकी घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने सोलापूर शहर जिल्ह्याच्या संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी तसेच शिवसैनिक यांची बैठक आयोजित करून योग्य त्या सूचना दिल्या जाणार आहेत. लालसेपोटी व कारवाईच्या भीतीने शिवसेनेची साथ सोडली. त्यांच्या जागेवर आता नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिकांवर जबाबदारी देण्यात येणार असल्याचे कोकिळ यांनी सांगितले.
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी वेळ आणि स्थळ निश्चित केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जात आहे. पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी वेळ व स्थळ निवडले जाणार आहे. याची माहिती मुंबई येथील पक्ष कार्यालयास दिली जाणार आहे. यासाठी शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी दिलेल्या सूचनेनुसार सोलापूर दौऱ्यामध्ये यासंबंधी बैठक घेतली जात आहे. बैठकीतील विविध मुद्दे पक्ष कार्यालयास कळवले जातील. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा निश्चित केला जाईल.
गळती लागलेल्या सेनेला उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यातून देणार नवसंजीवनी
सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील शिवसेनेला खिंडार पाडण्यात शिंदेसेनेनेला यश आले आहे. शिवसेनेचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार तथा जिल्हाप्रमुख अमर पाटील, तसेच माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत पक्षप्रवेश केला आहे. ऑपरेशन टायगर माध्यमातून शिंदे सेना उरलेल्या ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक काबीज करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या पक्षाला नाव संजीवनी देण्याचे आव्हान असणार आहे. यासोबतच पक्ष वाढीसाठी, मजबुतीकरणासाठी आणि संघटन करण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. सच्चा शिवसैनिकांच्या खांद्यावर शिवसेनेची धुरा सोपवली जाणार आहे. अनेक शिवसेनिकांनी शिवसेनेची साथ सोडली अशांना मागे टाकून नवनवीन पदाधिकारी नेमून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी लागणार आहे.
घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा
सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागातील शिवसेनेला अधिक बळकट येण्यासाठी, ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागांमध्ये नवनवीन शाखा सुरू करण्यात येणार आहेत. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी तसेच त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी नवीन संकल्पना सुरू करण्यात येणार आहे.” घर तिथे शिवसैनिक आणि गाव ते शाखा..”या नव्या संकल्पनेच्या माध्यमातून शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
– अनिल कोकीळ, जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे