वेळ आल्यानंतर पत्ते ओपन करणार ; परंतु सध्या तरी महायुतीतूनच

महापालिका निवडणूक महायुती युतीतूनच लढणार – अमोल शिंदे 

मात्र वेळ आल्यानंतर पत्ते ओपन करणार 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१ डिसेंबर

आगामी महापालिका निवडणूक महायुतीतूनच लढणार आहे. यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्यासोबत चर्चा आणि बैठका सुरू आहेत. महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसल्याने यासंबंधी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येईल. मात्र सध्याच्या घडीला महायुती मधूनच निवडणुक लढवली जाईल. भाजपने आम्हाला विधानसभा निवडणुकीत महापालिकेला आमच्या पक्षासाठी २५ जागा सोडण्याचा शब्द दिला होता. आता तो शब्द खरा ठरवण्याची वेळ जवळ येत आहे. आम्हाला खात्री आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या शब्दाला जागतील आणि महायुतीमधून महापालिकेची निवडणूक लढवली जाईल. त्यावरच पक्षाची पुढील आखणी आणि रणनीती अवलंबून असणार असल्याचे उत्तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिले.

पुढे ते म्हणाले, सध्या शहरांमध्ये वातावरण ढवळून निघत आहे. माजी नगरसेवक भाजपच्या झेंड्याखाली डेरे दाखल होत आहेत. प्रत्येकांना आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. मात्र निवडणुकीमध्ये अंतिम काळ महत्त्वाचा असतो. शेवटच्या टप्प्यात राजकारण बदलते. आमच्या पक्षाची देखील रणनीती ठरवली जात आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. इच्छुकांची फळी आमच्याकडे तयार आहे. येणारा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. भाजप पक्षामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. आमच्या पक्षात देखील बोलणी सुरू आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून याबाबत निर्णय होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री तथा निरीक्षक प्रताप सरनाईक यांच्यासोबत युती संदर्भात चर्चा झालेली आहे. महापालिका निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यानंतर निवडणुकीच्या संबंधी कामकाजाला अधिक गती येईल. मात्र सध्या तरी महायुतीमधूनच निवडणूक लढण्याची शिवसेनेची तयारी आहे.

 

आमचा वेळ आल्यानंतर पत्ते ओपन करणार 

सध्या सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी पार्टी इच्छुक तसेच आजी-माजी नगरसेवकांना आपल्या पक्षांमध्ये घेण्यासाठी धडपड करत आहे. तसेच चित्र शहरात दिसून येत आहे. मात्र आमच्या पक्षातील नेते देखील सक्रिय आहेत. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आमचा वेळ येईल त्यानंतर आम्ही आमचे पत्ते ओपन करू असे देखील अमोल शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *