टेंभुर्णी येथे टिपूस चांद राती फोनाफोनी झाली … अन् लोटसला हरवण्यासाठी लोटसमध्ये युती ठरली !

टेंभुर्णी येथे टिपूस चांद राती फोनाफोनी झाली.. अन् युती ठरली !

भाजपचा करेक्ट गेम बाण-घड्याळ वाजणार भाजपचे बारा ? रात्रीतून फिरली जादूची कांडी अन् सत्ताधारी आले एकत्र 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर दि.२८ डिसेंबर 

राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरचे संपर्कमंत्री ना.दत्तात्रेय भरणे आले अन् जादूची कांडी फिरवून गेले… टेंभुर्णी येथे टिपूस चांद राती फोनाफोनी झाली … अन् युती ठरली ! चंद्राच्या साक्षीने शिवसेना राष्ट्रवादीचा मिलाप झाला. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सहमती दर्शवली आणि सकाळी उठून लोटस हॉटेल गाठले. लोटसला हरवण्यासाठी लोटसमध्ये झाली महायुतीच्या नेत्यांची मांदियाळी…

“राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फोनवर संपर्क साधला. युतीसाठी शब्द टाकला.. दोन्ही पक्षांकडून होकारार्थी शब्द निघाला… सकाळी उठून युतीची वाटाघाटी सुरू झाली..”

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच, सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमधील भारतीय जनता पक्षाला बाजूला सारत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे सोलापुरात भाजपला खिंडीत गाठून ‘शिवसेना-राष्ट्रवादी’चा महापौर बसवण्याची रणनीती आखण्यात आली आहे.सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण १०२ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी ५१-५१ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या ५१-५१ च्या फॉर्म्युल्यामुळे दोन्ही पक्षांना समान संधी मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांचा ओघ मोठा आहे. १०२ जागांसाठी जवळपास ४०० ते ५०० कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तितक्याच प्रमाणे शिवसैनिकांनी देखील शिवसेनेकडे देखील अर्ज दाखल केले आहेत.

ज्याप्रमाणे राज्याच्या विकासासाठी अजित पवार महायुतीत सहभागी झाले, त्याच धर्तीवर सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. या नव्या युतीमुळे भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून, सोलापूरच्या निवडणुकीत आता रंगत वाढली आहे.

वाटाघाटीत नेत्यांचा लागणार कस

राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात नवीन समीकरणे सुरू झाली आहेत. पक्षाचा इलेक्टिव मेरिट या ठिकाणी देखील कामी येणार आहे. ज्या पक्षाचा उमेदवार ज्या भागात मजबूत आहे तो प्रभाग त्या पक्षाला सोडण्याचा निर्णय प्राथमिक बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना ज्या प्रभागात मजबूत आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमी जागा मिळतील तर त्या उलट ज्या भागात शिवसेनेचा प्रभाव कमी आहे. त्या प्रभागात राष्ट्रवादीला जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रभागाची वाटाघाटी किचकट असून वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल असे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *