श्रीशिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे तीन दिवस होणार शिवशंभू विचारांचा जागर !
हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन…
प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.७ जून
श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी निमित्त अर्थात श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तीन दिवस शिवशंभू विचारांचा जागर होणार असल्याची माहिती श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे संजय साळुंखे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे रविवारी (दि. ८) सकाळी आठ वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुना पुणे नाका येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करण्यात येणार आहे. सोमवारी (दि. ९) सकाळी आठ वाजता श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रंगभवन येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानात श्री शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे.
तसेच मंगळवारी (दि.१०) दुपारी चार वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापासून देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत लेझीम पथक, हलगी पथक, वारकरी पथक, शिवकालीन मर्दानी लाठीकाठी शस्त्र पथक आदींचा समावेश असणार आहे. श्री शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यातील या सर्व कार्यक्रमांना हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे संजय साळुंखे यांनी केले.
या पत्रकार परिषदेस श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे ओंकार देशमुख, ओंकार चराटे आदी उपस्थित होते.