शिवाजी महाराजांचा जयघोष करत सोलापुरातील मावळे भवानी ज्योत घेऊन रायगडकडे रवाना…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.७ जून
श्रीमंतयोगी, जाणता राजा, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सोलापुरातील मावळे भवानी ज्योत घेऊन रायगडकडे रवाना झाले. यावेळी शिवगर्जना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत, महिला मुली तसेच आबालवृद्ध शिवप्रेमी व शिवभक्तांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडची वाट धरली.
दरम्यान, शिवराज्य राज्याभिषेक सोहळ्यासाठी सालाबादप्रमाणे तुळजापूर येथून भवानी ज्योतचे पूजन सोलापूर येथील भीमाशंकर थोबडे नगर मधील रहिवाशांच्यावतीने करण्यात आले होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची आरती करण्यात आली. त्यानंतर शिवगर्जना देऊन जय भवानी जय शिवाजी गजरात भवानी ज्योतचे पूजन करण्यात आले. यावेळी अनिल शिंदे, परशुराम भिमाळी, दशरथ मोरे, प्रमोद चुगे, उत्कर्ष वैद्य, पांडुरंग मोरे, यांच्यासह भीमाशंकर थोबडे नगर मधील स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करून लोकशाही मूल्यांची स्थापना केली.
६ जून १६७४ या दिवशी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम सिंहासन दुर्गराज रायगड येथे प्रस्थापित होऊन शिवराय छत्रपती झाले. खऱ्या अर्थाने तो हिंदुस्थानाचा पहिला स्वातंत्र्य दिनच आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करतानाच अष्ट प्रधान मंडळाची निर्मिती करून लोकशाही मूल्यांची स्थापना देखील यादिवशी केली. अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर या देशाला भुमीपुत्रांचे स्वराज्य लाभले. छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेकाने असंख्य मावळ्यांच्या बलिदानाचे सार्थक झाले. या महान दिवसाची आठवण म्हणून प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात भवानी ज्योत रायगडकडे मार्गस्थ होते.
– अनिल शिंदे, स्थानिक नागरिक