शिवजयंती निमित्त शिवभक्त महिलांनी कपाळावर कोरली शिवरायांची प्रतिमा…
टॅटूच्या माध्यमातून नव्या पिढीला शिवरायांची देणार शिकवण !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१७ फेब्रुवारी
हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात सध्या उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक अबालृद्ध शिवजयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करत आहे. याच अनुषंगाने सोलापूर शहरातील काही शिवभक्त महिलांनी शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली शिवभक्ती सादर करत कपाळावरच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा कोरली आहे. आरती पवार श्रुती हंचनाळकर शुभांगी जगदाळे आणि गंगा गुरव या त्या महिलांची नावे आहेत.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आत्मीयता महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आहे. मात्र नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळावेत, किशोरवयीन यासाठी पुढाकार घेत, महिलांनी चक्क स्वतःच्या कपाळावरच टॅटू काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मुलांमध्ये उत्सुकता वाढण्यासाठी ही युक्ती महिलांनी निर्माण केली आहे. आता मुलांमध्ये शिवरायांबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना शिवरायांची अधिक माहिती देण्यासाठी पुढील तीन दिवसात अनेक उपक्रम आम्ही राबवून असल्याचे या महिलांनी सांगितले. शेवटी काळ कोणताही असो शिवकाळ किंवा सध्याचा मुलांना घरासाठी आई जे करते त्याला तोड नसतेच हेच या त्यांच्या शिवभक्ती वरून दिसून आले.
छत्रपती शिवाजी महाराज हे संबंध राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आम्ही अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी कपाळावर त्यांची प्रतिमा करून घेतली आहे.
श्रुती हंचनाळकर गृहिणी.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही प्रेरणादायक आहे. लहान मुलांना ते समजावे यासाठी विविध उपक्रम तीन दिवस राबवणार आहोत. त्याची सुरुवात म्हणून शिवरायांची प्रतिमा कपाळावर करून आम्ही त्यांना स्मरण केले आहे.
आरती पवार,गृहिणी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल लहानपणापासून आदर आहे. नवीन पिढी मात्र त्यांच्या कार्यापासून अनभिज्ञ आहे. आधुनिक काळातील लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कळावेत यासाठी वेगळ्या पद्धतीने हा उपक्रम आम्ही राबवला. सोसायटीतील लहान व किशोर मुलांचे ते लक्षवेधी ठरत आहे. आता तीन दिवस अन्य उपक्रम राबवून शिवरायांच्या विजयाचा जागर करणार आहोत.
– गंगा गुरव, गृहिणी.
सध्याची लहान मुले व किशोरवयीन मुले यांच्यासमोर टीव्ही मोबाईल मध्ये दिसणारे मोटू पतलू, शिनचॅन असे कार्टूनच वारंवार असतात. त्याचा परिणाम त्यांच्या वर्तनातही दिसून येतो. भविष्यात त्यांना चांगल्या मार्गावरती यावयाची जाणीव व्हावी यासाठी आम्ही पण त्याच प्र-कारे विचार केला. शिवरायांचा टॅटू आपल्या कपाळावर काढून त्यांचे लक्ष वेधण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आता तीन दिवस शिवरायांच्या कार्याविषयी माहिती त्यांना विविध उपक्रमातून देणार आहोत.
– शुभांगी जगदाळे, गृहिणी.