देशाचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस स्त्यूत्य सामाजिक उपक्रम ऐवजी होतोय ” खाऊ वाटपाने ” साजरा !
अशाच कार्यक्रमातून पदाधिकारी कार्यकर्ते मानतात धन्यता….
आपल्या नेत्याच्या वाढदिनी कार्यकर्त्यांमध्ये दिसते निरूत्साहाचे वातावरण
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१२ डिसेंबर
देशाचे नेते माजी केंद्रीय कृषीमंत्री राज्याचे चारवेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त शहरातील वातावरण उत्साहाचे असायला पाहिजे होते. परंतु शहरात सर्वत्र निरूत्साह दिसत आहे. देशाच्या नेत्यांचा वाढदिवस हा विविध स्त्यूत्य सामाजिक उपक्रमांनी साजरा होणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. एखाद्या लहान मुलांच्या वाढदिवसाप्रमाणे गल्ली गल्लीत खाऊ वाटप करून, नेत्यांचा वाढदिवस साजरा होतोय का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
वास्तविक पाहता शरद पवार हे राजकारणातील चाणक्य नीती खेळण्यास महिर मानले जातात. परंतु आता पवार यांच्या गटाला उतरती कळा लागली की काय असा सवाल उपस्थित होत आहे. गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात देखील एक प्रकारची मरगळ आलेले दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा अत्यंत जिव्हारी लागला आहे. असे चित्र यावरून दिसत आहे. तरी देखील झालेल्या पराभव पचवून पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार हे सज्ज झालेले असताना सुद्धा पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र आपल्या नेहमीच्या रडगण्यात अडकलेले आहेत. कोण करणार ? काय गरज आहे ? दरवेळेस मीच करू का ? अशा चर्चा आता कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळत आहे.
दरम्यान, पक्षातर्फे सद्भावना कार्यक्रम आयोजित केलाय खरा, पण त्यामध्ये खाऊ वाटप, शालेय साहित्य वाटप, असेच कार्यक्रम घेण्यात आले आहेत. स्वतः च्याच आश्रम शाळेत अन्नदान करणे, शालेय साहित्य वाटप करणे, होतच राहतात. याशिवाय विविध स्त्यूत्य सामाजिक उपक्रम राबविण्याऐवजी कार्यकर्ते असेच कार्यक्रम घेण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात उदासीन भूमिकेमुळे सर्वत्र निरुत्साह पहावयास मिळत आहे.