शरद पवार राष्ट्रवादीतही पेटले नाराजीनाट्य
कट्टर भाजपा समर्थकास पाठवले शरद पवारांच्या बैठकीला; मात्र अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी फेटाळला आरोप

प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सर्वांचे लक्ष
सोलापूर व्हिजन न्युज/ प्रतिनिधी
सोलापूर, दि.३० ऑक्टोबर-
स्थानिक स्वराज्य आगामी संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. दरम्यान या बैठकीला सोलापूर शहरातून पक्षाचा वरिष्ठ पदाधिकारी किंवा वरिष्ठ नेता जाणे अपेक्षित असताना किंवा पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यास पाठवणे संयुक्तीक असताना त्यांना डावलून भाजपाचा कट्टर समर्थक महेश गाडेकर यांना या महत्त्वाच्या बैठकीसाठी पाठवण्यात आल्याचा आरोप शरद राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्यावर केला आहे. याप्रकरणावरून संतप्त झालेल्या जुन्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी खरटमल यांच्या गॅस एजन्सीच्या कार्यालयात धडक देऊन त्याना जाब विचारला.
शरद राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीचे राजकारण पेटले असून येत्या ४ नोव्हेंबरला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात काय शिजते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान या प्रकरणात शहराध्यक्ष खरटमल यांनी आरोप फेटाळून लावला आहे. खरटमल म्हणाले, शहराध्यक्षपदासाठी कोणती तरी असे वेगळे कांड करत आहे, मला शहराध्यक्षपदाचा मोह नाही, माझा राजीनामा संबंधितांनी शरद पवार यांच्याकडे न्यावा आणि शहराध्यक्षपद खुशाल पदरात पाडून घ्यावे. शहराध्यक्षपदासाठी कोणी तरी कुरघड्यांचे राजकारण करीत आहे. कंपनीची बैठक असल्याने मी पवार साहेबांच्या बैठकीला जाऊ शकलो नाही गाडेकरांना पाठवले. पक्षाने कधीही बैठक बोलावल्यावर मी जायला रिकामा नाही. बैठकीसाठी पाठवण्यात आलेले महेश गाडेकर हे भाजपचे नसून ते राष्ट्रवादीचेच आहेत.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर होते त्यावेळी गाडेकर हे राष्ट्रवादीचे वॉर्ड अध्यक्ष होते. शिवाय विधानसभेच्या निवडणुकीवेळी स्व. महेश कोठे यांच्या प्रचारात ते सक्रीय होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सात महिन्यांपूर्वी गाडेकर यांच्या घरी भोजनासाठी गेले होते. हे सगळे पाहता गाडेकर हे भाजपचे आहेत कसे म्हणता येईल. शरद पवार यांच्यासमवेत मी सच्चाईने आहे. त्यांच्या बैठकीला भाजपचा समर्थक कसा पाठवेन ? गाडेकर यांची संस्था आहे. या संस्थेच्या कार्यक्रमासाठी भाजपाचे नेते आले असतील, अशी पुष्टीदेखील खरटमल यांनी जोडली.
शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला आपल्याला जाता येत नसेल तर शहराध्यक्ष म्हणून काम का करत आहात असा जाब पदाधिकाऱ्यांनी विचारला. शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या या कारणामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकच खळबळ उडाली आहे. यावेळी मनोहर सपाटे, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार, माजी नगरसेविका बिसमिल्ला शिकलगार, अजित पात्रे, सोपान खांडेकर उपस्थित होते. मुंबईमधील बैठकीसाठी खरटमलांनी भाजपचा कट्टर समर्थक पाठवल्याचा आरोप शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. याचवरुन शरद राष्ट्रवादीत राजकारण पेटले आहे.
शरद पवार, सुप्रिया सुळेंकडे तक्रार केली : प्रशांत बाबर
शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केलेल्या प्रकारावरून पक्षात मोठी नाराजी आहे. याप्रकाराची तक्रार थेट राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार यांच्याकडे करण्यात आली असून येत्या ४ नोव्हेंबरला प्रदेशाध्यक्ष शिंदे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. याप्रकरणाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. आम्ही भेटायला गेल्यानंतर खरटमल यांनी दिलेल्या उत्तरांमुळे पदाधिकारी नाराज झाले असल्याचे प्रशांत बाबत यांनी सांगितले.