संत गजानन महाराजांच्या स्वागतासाठी उपलप मंगलकार्यालय सज्ज ; वारकऱ्यांसह भाविकांना होणार महाप्रसादाचे वाटप
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १० जुलै – आषाढी यात्रेच्या निमित्ताने शेगावहून पंढरपूरला निघालेल्या संत श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरात प्रवेश केल्यानंतर परंपरेप्रमाणे सम्राट चौक येथील सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात संत भेट झाली. त्यानंतर दुपारी कुचन हायस्कूल या ठिकाणी पालखीचा मुक्काम होता. सदरचा मुक्काम संपल्यानंतर पालखी सकाळी नऊ वाजता सात रस्ता ऐकल्या उपलप मंगल कार्यालयात भाविकांच्या दर्शनासाठी मुक्कामी असणार आहे. उद्या सकाळी नऊ वाजता उपलप मंगल कार्यालयात संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत होणार आहे.त्यानिमित्ताने मंगल कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली. सर्व मंगल कार्यालय स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर मंगल कार्यालय परिसरात मंडप उभारण्याचे काम पूर्ण झाले. भाविकांसाठी दर्शन रांगा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसाद बनवण्यासाठी स्वयंपाक गृह तसेच विविध प्रकारचे साहित्य स्वच्छ करून प्रसादाची तयारी सुरू केली आहे. ज्या ठिकाणी श्रींची पालखी विराजमान होणार आहे. त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
संत श्री गजानन महाराज पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरवर्षी सोलापूर सह इतर जिल्ह्यातून आणि शहरातून असंख्य भाविक उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी श्रींचे दर्शन घेण्यासाठी दाखल होत असतात. भाविकांना श्रींचे दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.
– ऋतुराज उपलप , उपलप मंगलकार्यालय