बहुजन समाज पार्टीने एस.सी आणि एस.टी.आरक्षणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा केला विरोध…..

सोलापूर व्हिजन
सोलापूर दी २१ ऑगस्ट – सर्वोच्च न्यायालयाने एस.सी आणि एस.टी.आरक्षणातील क्रीमीलेयर आणि उप-वर्गीकरणाबाबत दिलेला निर्णयाच्या निषेधार्थ भारतातील अनुसूचित जाती-जमातींनी २१ ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी ऑल इंडिया यांच्या वतीने देखील भारत बंदला पाठिंबा देत बंदची हाक दिली होती. बहुजन समाज पार्टी शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने रॅलीच्या माध्यमातून नवी पेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
दरम्यान यावेळी नवीपेठेत सर्व दुकाने सुरू होती. सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू होते. परंतु कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. यामुळे नवीपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. नवीपेठ मध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडला आहे. दगडफेक झाली आहे अशी अफवा सोलापूर शहरात वाऱ्यासारखी पसरली परंतु तशी कोणतीही घटना नवी पेठ मध्ये घडली नाही. बहुजन समाज पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आपले म्हणणे प्रसार माध्यमांसमोर मांडत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.
तत्पूर्वी बहुजन समाज पार्टीचे राज्य सचिव आप्पासाहेब लोकरे आणि माजी नगरसेवक बबलू गायकवाड यांनी आपली भुमिका विषद करताना या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला. दरम्यान काही काळ नवी पेठ मध्ये तणाव होता फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटना ठिकाणी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली. व्यापाऱ्यांनी काही काळानंतर दुकाने सुरू ठेवत आपले दैनंदिन व्यापार सुरू केल्याचे चित्र दिसून आले.