समता सप्ताहात ‘ज्ञानदालन’ खुले; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पुन्हा सुरू
सभापती संस्कृती सातपुते यांच्या पाठपुराव्याला यश; नागरिक व विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा
सोलापूर व्हिजन,
सोलापूर, दि. ८ एप्रिल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात समता सप्ताह साजरा केला जात असून, याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सर्वसामान्यांसाठी पुन्हा खुले करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. समाजकल्याण विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह वाचनप्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे.

समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे वाचनालय पुन्हा सुरू होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या या वाचनालयाबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत होती. समता सप्ताहाच्या निमित्ताने ते सुरू करण्याची मागणी वाढत असतानाच, प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे.
समता सप्ताहादरम्यान विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वितरण केले जाणार आहे. त्याचबरोबर पथनाट्य, चर्चासत्रे आणि व्याख्यानमालेच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश दिला जाणार आहे.
दरम्यान, वाचनालय सुरू करण्यापूर्वी त्याची स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असून, लवकरच ते नागरिकांसाठी पूर्णतः सज्ज होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यां विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय उपयुक्त ठरणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरणाला चालना मिळणार असून, सामाजिक समतेच्या विचारांचा प्रसार अधिक प्रभावीपणे होणार आहे. समाजकल्याण विभागाच्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.