सत्तर फुट भाजी मंडईवरील कारवाईमुळे भाजी विक्रेत्यांवर संक्रांत !
कॉ.आडम मास्तरांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना प्रकरणात शिथिलता देण्याचे केले निवेदन
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि १६ जून
सोलापूर महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाने ७० फुट भाजी मंडई परिसरात सुरू केलेल्या कारवाईमुळे गेल्या अनेक दिवसांपासून भाजीपाला, फळे, व अन्य जीवनावश्यक वस्तूंची विक्री ठप्प झाली आहे. महानगरपालिका नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने या भागातील चारचाकी फेरीवाले, फळ विक्रेते आणि हातगाडीधारकांविरुद्ध जप्ती केली. पोलिस बंदोबस्तात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू ठेवली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, प्रशासनाच्या कारवाईचा निषेध करत विक्रेत्यांनी आपल्या कुटुंबांसह मोर्चा काढून मनपा आयुक्त कार्यालयावर धडक दिली. शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे आयुक्तांना आपली कैफियत सांगितली, परंतु कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे विक्रेत्यांमध्ये संताप आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने विक्रेत्यांचे शिष्टमंडळने (दि.१६) जून रोजी रात्री १०:३० वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सत्तर फूट येथे भाजी विक्री करण्याची मागणी माजी आमदार आडम मास्तर यांनी निवेदनाद्वारे केली.
सदरचे निवेदन स्विकारल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली असून, लवकरच संबंधित विभागांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचीही उपस्थिती होती. शिष्टमंडळात खाजाभाई करजगी, रुक्मिणी कवळे, गणेश वाघमारे, चांद शेख, जाफर शेख, सादिक बागवान, मल्लय्या खरात, रियाज पठाण, बबलू बागवान आदींचा समावेश होते.