घटस्थापनेसाठी ग्रामदेवता श्रीरूपाभवानी मंदिरातील तयारी पूर्ण !
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सी.सी.टी.व्ही कॅमेरा आणि पोलीस बंदोबस्त..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.०२ ऑक्टोंबर – सोलापूरची कुलस्वामिनी श्रीरूपाभवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे ३ ते १७ ऑक्टोबर याकालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवा निमित्त यात्रा कालावधीत दररोज रात्री देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना काढण्यात येणार आहे. धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांच्या दर्शनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
त्याच अनुषंगाने उद्या गुरुवार (दि. ३) ऑक्टोबर रोजी सकाळी १२:१५ वाजता श्रीरूपाभवानी देवी मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात येणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यात्रेच्या कालावधीत दररोज देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना काढण्यात येणार आहे. तसेच सोमवार (दि.७) ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी असून सायंकाळी ५ वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर मंदिर तसेच मंदिर परिसरात सर्व जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांना ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. त्याच पद्धतीने मंदिर परिसरात विविध प्रकारचे स्टॉल्स सजवण्यात आले आहेत. यामध्ये खेळणी, प्रसादिक साहित्य, विविध खाद्यपदार्थ, पाळणे आदींचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. तसेच दर्शनरांगा तयार करण्यात आले आहेत. यामध्ये प्रवेश आणि बाहेर अशा पद्धतीच्या रांगा बॅरिगेट्स लावून करण्यात आले आहेत.
त्याच पद्धतीने शुक्रवार (दी.११) रोजी ऑक्टोबर दुर्गाष्टमी अलंकार महापूजा असून रात्री ७ वाजता मसरे यांच्या घरातून दहीहंडीची मिरवणूक निघणार आहे. रात्री देवीची महापूजा करून छबिना काढण्यात येणार आहे. शुक्रवार (दि.१२) ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असून सकाळी अलंकार महापूजा होऊन सायंकाळी पाच वाजता श्रीरुपाभवानी मातेचा पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी मंदिरापासून वाजत-गाजत प्रस्थान होणार आहे. पालखीतून श्री रुपाभवानी माता सीमोल्लंघनासाठी निघणार असून पार्क मैदानावरील शमीच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. येथे सीमोल्लंघन पार पडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोहळा मंदिराकडे प्रस्थान होईल. बुधवार (दि.१६) ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेनिमित्त श्रीदेवीची महापूजा दूधप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार (दि.१७) ऑक्टोबर रोजी सकाळी पौर्णिमेनिमित्त देवीची अलंकार महापूजा व रात्री छबिना काढण्यात येणार असून नवरात्रौत्सवाची सांगता करण्यात होणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा आणि पोलीस बंदोबस्त.
शारदीय नवरात्रौत्सव उद्यापासून सुरू होत आहे. या काळात मंदिरात देवी मातेच्या दर्शनासाठी घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भाविकांचा ओघ सुरूच राहतो. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेराची करडी नजर राहणार आहे. यासाठी सुरक्षा कक्षाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.