सोलापूरच्या पावनभूमीत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सहर्ष स्वागत

वात्सल्य’ रोटरी ह्युमन मिल्क बँक ठरणार बालकांसाठी जीवनदायी – आयुक्त डॉ सचिन ओंबसे 

 

महापालिका आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांचा संयुक्त उपक्रमाचे झाले उद्घाटन 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२६ नोव्हेंबर 

शहरातील माता व नवजात बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘वात्सल्य’ रोटरी ह्युमन मिल्क बँक, सोलापूर या अभिनव प्रकल्पाचा भव्य कार्यारंभ सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे, वैद्यक अधिकारी डॉ. राखी माने, डॉ. वैशाली शिरशेट्टी, रोटेरियन सुनील दावडा, डॉ. बाळासाहेब शितोळे, डॉ. किरण सारडा, डॉ. जानवी माखिजा, संतोष भंडारी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी प्रमुख मान्यवर महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, सोलापूर महापालिका आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित होणारा हा उपक्रम शहरातील आरोग्य क्षेत्रातील क्रांतिकारक पाऊल ठरत असून, मातृदूधाची गरज भासणाऱ्या नवजात बालकांसाठी जीवनदायी ठरणार आहे. या उपक्रमामुळे नवजात शिशू मृत्यूदरात घट, आरोग्य जटिलता टाळणे, बालकांचे सर्वांगीण पोषण, तसेच मातृत्वाबद्दल सकारात्मकता निर्माण होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.उपायुक्त आशिष लोकरे यांनी प्रकल्पातील सर्व सहयोगी संस्था, वैद्यकीय तज्ञ व स्वयंसेवकांचे कौतुक करत अशी उपक्रमे समाजातील संवेदनशीलता वाढवतात, असे मत व्यक्त करताना मातृ-शिशू आरोग्य ही प्राथमिक जबाबदारी असून ‘वात्सल्य’ मिल्क बँक हे शहराच्या विकासात ऐतिहासिक योगदान ठरेल. प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल.

 

दरम्यान, वात्सल्य’ रोटरी ह्युमन मिल्क बँक मार्फत गरजू, अकाली जन्मलेली, कमी वजनाची किंवा गंभीर आरोग्यस्थितीतील नवजात बालकांना शास्त्रोक्त प्रक्रिया करून सुरक्षित, शुद्ध व पोषक मातृदूध उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वैद्यकीय संशोधनानुसार मातृदूध हे नवजात बालकांसाठी सर्वोत्तम पोषणमूल्यांचे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि जीव वाचवणारे अमृत मानले जाते. अनेक मातांना वैद्यकीय कारणांमुळे स्वतःचे दूध देणे शक्य नसते, अशा मातांसाठी व बालकांसाठी ही मिल्क बँक मोठा आधार ठरणार आहे.

तत्पूर्वी ‘वात्सल्य’ प्रकल्पाचे प्रमुख डॉ. निहार बुरटे व सह-प्रमुख डॉ. मिलिंद शाह यांनी प्रकल्पाची कार्यपद्धती, प्रक्रिया, तांत्रिक सुविधा आणि भविष्यातील कार्ययोजना उपस्थितांसमोर सविस्तर मांडली. दात्या मातांकडून मिळालेला दूध नमुना वैद्यकीय तपासणीनंतर पाश्चराइज करून उच्च तंत्रज्ञानाद्वारे सुरक्षित पद्धतीने संग्रहित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या उपक्रमाबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्याचेही त्यांनी जाहीर केले.रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचे अध्यक्ष संतोष सपकाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “माता-बालकल्याण क्षेत्रात सोलापूर शहरास अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे. ह्युमन मिल्क बँक हा प्रकल्प हजारो बालकांसाठी जीवनदायी ठरेल आणि रोटरीचा समाजोपयोगी कार्याचा वारसा पुढे नेईल.क्लबचे सचिव युगंधर जिंदे यांनी आभारप्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *