राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून कामगारांना मिळणार हक्काचे घर…

राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून कामगारांना मिळणार हक्काचे घर…

प्रधानमंत्री आवास निर्माण योजना शहरी अंतर्गत ५ हजार पैकी १ हजार घरकुलाचे लवकरच होणार हस्तांतरण 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा – डॉ. किरण देशमुख…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२९ मार्च

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मोजे दहीटणे येथे राष्ट्रतेज अटल बिहारी वाजपेयी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या  ५ हजार घरकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या ५ हजार घरकुलांपैकी १ हजार घरकुलांचे हस्तांतरण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांनी सांगितले. यावेळी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन सुरेश बिराजदार, विकासक अंकुर पंध्यें, अभियंता महिंद्रकर, राजेश दीड्डी आदींची उपस्थिती होती.

        

      सोलापूर शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. एकूण १४ लाख लोकसंख्या असलेल्या या शहरामध्ये साधारणतः ४० ते ५० टक्के लोकसंख्या ही विविध क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटीत कामगारांची आहे. हा कामगार वर्ग मिळेल त्या मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड मारून किंवा झोपडीत राहून आपला उदरनिर्वाह करीत असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी दिवसेंदिवस योग्य त्या मुलभूत सोयी सुविधांचा प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे. नेमकी हीच समस्या जाणून सोलापूर शहर उत्तरचे आ. विजयकुमार देशमुख यांनी पुढाकार घेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)’ अंतर्गत या कामगार वर्गासाठी ५००० घरकुल उभारणीचा संकल्प मांडला. लागलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असंघटीत कामगारांच्या उन्नतीकरिता व त्यांचे राहणीमान उंचाविण्याकरिता या संकल्पनेला लगेचच हिरवा कंदील दाखवला व या कार्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल आणि असंघटीत कामगारांकरिता सर्व मुलभूत सोयींनीयुक्त असे एक चांगले गृहसंकुल उभारले जाईल असे आश्वासन दिले.

सुरेश रेवप्पा बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)’ अंतर्गत सोलापुरातील असंघटीत कामगारांकरिता राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, दहिटणे, ता-उत्तर सोलापूर, जिल्हा-सोलापूर या संस्थेची स्थापना केली. सदर संस्थेच्या माध्यमातून सोलापुरातील असंघटीत क्षेत्रात काम करणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ई. डब्ल्यू. एस) कामगार जसे कि, रिक्षा चालक, शिलाई कामगार, यंत्रमाग कामगार, अडत कामगार, माथाडी कामगार, हॉटेल कामगार, भाजीपाला विक्रेते, रुग्णालयातील कर्मचारी, बांधकाम क्षेत्रातील कामगार, इतर व्यावसायिक दुकानात काम करणारे व अन्य गरजू कामगार वर्गासाठी ५००० घरांच्या बांधणीचे उद्दिष्ट प्रस्तावित करण्यात आले. समाजातील वंचित घटकांना अल्प किमतीत घरे उपलब्ध व्हावीत म्हणून ग्रीन झोन असलेल्या जमिनी प्रधानमंत्री आवास योजनेकरिता वापरण्याची परवानगी दिली. त्याअनुषंगाने सदर संस्थेच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये विकसित होत असलेल्या दहिटणे  परिसरामध्ये जागा घेण्यात आली. १५ ते २० वर्षापूर्वीचा शेळगी-दहिटणे परिसर व आताचा विकसित शेळगी-दहिटणे परिसर, हे सर्व परिवर्तन आ.देशमुख यांनी वेळोवेळी केलेल्या विकास कामांमुळेच घडून आल्याचे दिसत आहे.

ग्रीन झोनमुळे ग्रीनगृहनिर्माण संस्थेचे अल्प किमतीत घरकुल निर्मिती 

गोरगरीब कामगारही या परिवर्तनाचे अंग व्हावे या तळमळीने राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेची स्थापना झाली. ग्रीन झोन असल्यामुळे सदर परिसरामध्ये अल्प किंमतीत घरकुल प्रकल्पासाठी जागा उपलब्ध झाल्यामुळे संस्थेस घरकुलाची किंमत कमीतकमी राखण्यास बहुमोल मदत झाली. तसेच बांधकाम कामगारांना विशेष अनुदान दोन लक्ष रुपये प्राप्त करून दिल्यामुळे घरांच्या किमती आणखी कमी झाल्या. बँकेचे सहकार्य देखील मोठ्या प्रमाणात लाभले. आमदार विजय देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे नवी वसाहत साकारत आहे.

– अंकुर पंदे, विकासक राष्ट्रतेज कामगार गृहनिर्माण संस्था. 

नगरोत्थान योजना आणि बँकेच्या सहकार्यातून कामगारांना मदत 

सदर गृह्प्रकल्पामधील पहिल्या टप्प्यातील १२०० घरांच्या प्रकल्पाची एकूण किंमत रु.७४.७६ कोटी इतकी असून, एका घरकुलाची किंमत ही रु.६.२१ लाख अशी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना रु. २.५ लाख सबसिडी मिळाल्यानंतर सर्वसाधारण घटकातील जनतेला हे घरकुल रु.३.७१ लाख किमतीमध्ये उपलब्ध असेल, ते त्यांच्या बचतीतून अथवा गृहकर्जाच्या माध्यमातून सदर घरकुल मिळवू शकतात. तसेच, नोंदणीकृत व सक्रीय बांधकाम कामगार, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार व इतर कल्याणकारी मंडळाकडून अतिरिक्त प्रत्येकी रु.२.०० लाखाच्या सबसिडीस पात्र ठरल्यास हे घरकुल त्या सभासदांना फक्त रु.१.७१ लाख मध्ये उपलब्ध होते. तसेच, मालकांनी विशेष प्रयत्न करून इतर कामगारांना घरकुलासाठी सोलापूर जनता बँकेकडून अत्यल्प व्याजदरामध्ये गृहकर्ज उपलब्ध करून सुलभ मासिक हप्त्यात परतफेडीची सुविधाही करून दिलेली आहे. नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून विजयकुमार देशमुख यांनी सदर गृहप्रकल्पामध्ये रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, इ. मुलभूत सोयी-सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला, तर या प्रकल्पासाठी खास बाब म्हणून स्वतंत्र सब-स्टेशन व अंतर्गत दिवाबत्ती करिता शासनाच्या एन.एस.सी.योजनेमधून निधी मंजूर करून दिला.

– डॉ किरण देशमुख, माजी नगरसेवक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *