– राणाप्रताप नगरातील नागरिकांचे हाल बेहाल ; गेल्या अनेक वर्षांपासून सोसाव्या लागतात नरक यातना !
– लोकप्रतिनिधी महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी कर्तव्याला वाहिली तिलांजली..!
– ड्रेनेज चेंबरचे सांडपाणी घरात शिरल्याने रोगराईस मिळतेय आमंत्रण…
– “लाव लीजाव, टिमकी बजाव भूमिका सोडणार कधी ” उपस्थित केला जातोय सडेतोड प्रश्न ?
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्यूज ,
सोलापूर दि. २६ सप्टेंबर – विजापूर रोडवरील राणा प्रताप नगरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेजचे सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांना मरण यातना सोसाव्या लागत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही परिस्थिती कायम असल्याने नागरिकांचे घराबाहेर पडणे देखील मुश्किल बनले आहे. घराच्या वरांड्यामध्ये अर्धा फूट भरलेल्या सांड पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात रोगराईला आमंत्रण मिळत आहे.
विजापूर रोड येथील राणा प्रताप नगरमध्ये गेल्या चार ते पाच वर्षांपासून ही समस्या भेडसावत आहे. ड्रेनेज चेंबर लाईन मधून सांडपाणी ओव्हर फ्लो होऊन नागरिकांच्या घरामध्ये आणि वरांडांमध्ये साचत आहे. सांडपाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नसल्याने सदरचे सांडपाणी अंतर्गत रस्ते, तसेच नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे. सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था सध्या पूर्णपणे बंद झाल्याने सांडपाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नाही. राणा प्रतापनगर मधील ड्रेनेज चेंबरची लाईन नैसर्गिक उताराच्या दिशेने करण्यात आली होती. परंतु नर्सरी सुरू केलेल्या प्लॉटधारकाने ड्रेनेज चेंबर लाईन स्वतःच्या जागेतून नेण्यास मज्जाव केल्याने, सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान या समस्यावर महापालिका प्रशासनाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पाठपुरावा करत असल्याचे सांगण्यात आले. परंतु यावर अद्याप पर्यंत कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. दिवसेंदिवस सांडपाणी साचत राहील्याने सर्वत्र दुर्गंधी पसरून डेंगू मलेरिया सारख्या साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत आहे. अंतर्गत रस्त्यावर देखील सांडपाण्याचे तळे चाचल्याने नागरिकांना रस्त्यांवरून येणे जाणे देखील मुश्किल बनले आहे.
सदरच्या नगरात राहणाऱ्या वयोवृद्ध तसेच चिमुकल्यांना यासांडपाण्यामुळे रोगराईचे फुकटचे आमंत्रण मिळत आहे. महापालिका प्रशासन केवळ काम करण्याच्या बहाण्याने, “लाव लीजाव टिमकी बजाव”! करून निघून जातात परंतु वास्तविक पाहता त्यावर तोडगा काढला जात नाही. अशी समस्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळा आणि सणासुदीच्या काळात घरामध्ये आजारपण येत आहे, याला कोण जबाबदार ? असा प्रश्न देखील स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सदर स्थानिक नागरिकांच्या स्वयंपाकघर तसेच व्हरांड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
जीवाला काही बरे वाईट झाले तर कोण जबाबदार ?
गेल्या अनेक वर्षांपासून राणा प्रताप नगरमध्ये हीच परिस्थिती कायम असल्याने आमच्यासारख्या वयोवृद्ध नागरिकांना जगणे मुश्किल बनले आहे. घरामध्ये मी एकटीच राहते सांडपाण्यामुळे माझ्या जीवाला काही बरे वाट झाले तर यासाठी कोण जबाबदार असेल? घरामध्ये सांडपाणी साचून सर्वत्र दुर्गंधी पसरून रोगराई वाढत आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी केवळ बघायची भूमिका घेत आहेत यावर तात्काळ तोडगा काढावा.
– शैलजा दुबे , स्थानिक पीडित वयोवृद्ध महिला.
समस्याची फाईल वरिष्ठ विभागाकडे वर्ग केली आहे.
विजापूर रोडवरील राणा प्रतापनगर मध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनची ही समस्या कायम आहे. ड्रेनेज चेंबर लाईन करताना समस्या निर्माण झाली आहे. यासंबंधी वरिष्ठ कार्यालय आणि अधिकाऱ्यांकडे फाईल पाठवली आहे. यावर वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या पाणी नसण्याचे कामकाज सुरू केले आहे.
– नवनाथ बाबर, झोन अधिकारी सोलापूर महानगरपालिका.