सोलापूर शहर पाण्याखाली अग्निशामक दल हाय अलर्ट मोडवर

महापालिका प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यान्वित…
महापालिका आयुक्तांनी पूर परिस्थितीची केली पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या शाळेमध्ये नागरिकांसाठी केली पर्यायी व्यवस्था
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहर जिल्ह्यास पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहर परिसरात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. मंगळवारी रात्री देखील पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यानंतर शहराचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या जुना पुणे नाका, वसंत विहार, यशनगर, तुळजापूर महामार्ग यांसह अर्धे सोलापूर शहर पाण्याखाली गेल्याने सर्वत्र एकच हाहाकार माजलेला दिसून आला. हिप्परगा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने हे पाणी एखाद्या नदीप्रमाणे तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहू लागलेले दिसून आले. यामुळे येथील वाहतूक सकाळपासूनच संथ गतीने सुरू होती. तलावातील पाणी तुळजापूर महामार्गालगत असलेल्या ओढा आणि नाल्यामध्ये दखल झाले. ओव्हर फ्लो झालेल्या ओढ्यातून हे पाणी रस्त्यावर वाहण्यास सुरुवात झाली. या घटनेनंतर वाहनधारकांनी सतर्कतेच्या दृष्टिकोनातून वाहने सावकाश चालवण्यास सुरुवात केली.

तर शहरातील वसंतविहार, यशनगर, बाळे परिसरातील संतोष नगर,आदींसह विविध भागात पावसाचे पाणी शिरल्याने येथे देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्या अनुषंगाने मडकी वस्ती पासून जुना पुणे नाकाकडे येणाऱ्या पुलावरून आदिला नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बॅरिगेट्स लावून बंद करण्यात आला आहे. आत्तापर्यंत शहराच्या बाळे परिसरातील संतोष नगर, तोडकरवस्ती, जय मल्हार नगर आदींसह बार्शीरोड वरील नाल्यात पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढत चाललेला आहे. यामुळे शहरात महापुराचा परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पावसाचे पाणी देखील शहराकडे येणाऱ्या आदिला नदीत व त्या शेजारी असणाऱ्या नाल्यात पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढला असल्याने नदी व नाल्याकाठी असणाऱ्या नगरात गुडघाभर पाणी साचलेले दिसत आहे. महापालिका प्रशासनाने नालेसफाई केली नसल्याने पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न झाल्याने तो प्रवाह लोकवस्तीमध्ये शिरत असल्याचा आरोप येथील महिला व स्थानिक नागरिकांनी केला आहे.
शहर आणि जिल्हा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र पाणी थांबलं असून त्यामुळे खरिपातील तूर, उडीद, सोयाबीन, मुग यासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी दरवर्षी आपल्या काळ्या आईची ओटी भरण्याच्या भावनेने शेताची संपूर्ण मशागत करून खरिपाची पेरणी करतो, तो आपल्या दैनंदिन गरजांना फाटा तर देतोच, प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा देऊन पीक वाढीसाठी तो दिवस रात्र परिश्रम करतो. यंदा प्रारंभ पासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने आज शिवारात डोलत असलेली पिके, शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास या मुसळधार पावसामुळे मातीत मिसळला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने सर्वत्र झोडपून काढले आहे. या पावसामुळे नद्या- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे अनेक गावात नदी आणि ओढ्यांना पूर सदृश्य परिस्थिती आहे. नदी ओढ्यावर आलेल्या पुरामुळे बक्षी हिप्परगे ते सोलापूर जिल्ह्यातील वरळेगांव, वडजी वा मराठवाड्यातील सीमावर्ती भागातील खडकी धोत्री या मार्गाची वाहतूक खंडित झाली आहे. या दिवसात बक्षी हिप्परगा गावाचा सोलापूर शहराशी असलेला संपर्कही खंडित झाला आहे.

पावसाच्या जोरदार हजेरीनंतर शहरातील सखल भागात साचलेल्या पूर परिस्थितीची पाहणी महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी केली. शहराच्या वसंत विहार, यशनगर, जुने पुणे नाका, बाळे परिसरातील संतोष नगर तोडकरवस्ती आदीं परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन या भागाची माहिती घेतली. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, जुना पुणे नका स्म्शान भूमी येथील नाला पाण्याची पातळी वाढल्यामुळे तेथील दगडी पूल पाण्याखाली गेले आहे. त्याठिकाणी बॅरिगेट्स लावून रस्ता बंद करण्यात आलेला आहे. तसेच आदिला नदी बाळे परिसर तसेच पूना रोडवरील पद्मावती नगर भागामध्ये ले-आउट धरकांनी नसर्गिक पाण्याचा प्रवहा बदल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली होती. वसंत विहार येथील यश नगर, सहा कमान येथे पाणी पातळी वाढली आहे. त्याची सुद्धा त्या ठिकाणी भेट देऊन आयुक्तांनी परिस्थितीची पाहणी केली. संबंधित ले-आउटची धारकांच्या प्लॉटच्या नकाशे व मोजणीसह सखोल चौकशी करून, नियमबाह्य बांधकामांवर आवश्यक ती कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका आकूलवार,प्रकाश दिवाणजी विभागीय अधिकारी शाम कन्ना नॅशनल हायवेचे अधिकारी व संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था
शहरातील ५४ मीटर रस्ता परिसरातील रेल्वे ब्रिजखालील पाणी साचण्याची समस्या, गणेश नगर, अभिमानश्री नगर, यश नगर भाग २ बनशेट्टी नगर तसेच वसंत विहार येथील नाल्याच्या परीस्थितीची पाहणी करत आपत्कालीन यंत्रणेचा पाठपुरवा घेतला. येथे पाण्याची पातळी वाढल्यास ज्याघरात पाणी शिरण्याची स्थिती आहे. अशा घरातील नागरिकांना तत्काळ स्थलांतरित करण्याबाबतचे सूचना पत्र देण्यात आले. पर्यायी व्यवस्थेसाठी शहरातील शाळा क्रमांक २७ मध्ये तसेच सुंदराबाई डागा प्रशालामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्या परिसरामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अग्निशामक विभाग, जेसीबी तसेच २४ तास आपत्कालीन यंत्रणा ठेवण्यात आली आहे. त्या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यास त्यांनी त्वरित अपती व्यवस्थिपण विभागाशी संपर्क संपर्क साधावे असे आव्हान महापालिकेचे आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले.
आयुक्तांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी
महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागरिकांना पाणी साचणे, घरात पाणी शिरणे यामुळे होणारा त्रास सहन करावा लागू नये यासाठी त्वरित कारवाई करावी. त्यांनी संबंधित अभियंते व विभाग प्रमुखांना आपण आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत सूचना दिल्या आणि पावसाळ्यातील कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे आदेश दिले.

महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन तसेच अग्निशामक दलाला हाय अलर्ट मोडवर ठेवले आहे. अग्निशामक दलाकडे सद्यस्थिती १ अग्निशामक दल अधिकारी, ५६ फायरमन, २४ चालक अशी स्थिती असून यशनगर आणि तुळजापूरनाका येथे अग्निशामक दलाचे फायरमन, कर्मचारी आणि अग्निशामक वाहन प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत तैनात करण्यात आलेले आहे. तसेच शहरातील सखल भागासह शहराअंतर्गत असणाऱ्या नाल्यावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोरखंड आणि जाळ्या लावण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत अग्निशामक दल हाय अलर्ट मोडवर आहे.
अच्युत दुधाळ, प्रभारी अग्निशामक दल प्रमुख