शहरात पावसाला झाली सुरुवात ; पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने शहरात निर्माण केला गारवा…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २० जुलै – बऱ्याच कालावधीनंतर सोलापूर शहरात पावसाची संततधार सुरू झालेली आहे. मृग नक्षत्राच्या पावसानंतर पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने शनिवारी शहरात सकाळपासून हजेरी लावली आहे. संततधार कोसळणाऱ्या जलधारांमुळे शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सोलापूर शहर जिल्ह्यात सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर काही काळासाठी पावसाने ओढ दिली होती. आता मात्र वरून राजा कृपादृष्टी ठेवत असून सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी संततधार पाऊस सुरू झाला आहे. शहरामध्ये अचानक सुरू झालेल्या संत धार पावसामुळे चाकरमान्यांची तसेच विद्यार्थ्यांची त्रेधातीरपीट उडाली. काहींनी रेनकोटचा आधार घेतला तर काहींनी छत्रीचा आधार घेतला.
शनिवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवेत अल्हादायक गारवा निर्माण झाला होता.
दरम्यान हवामान खात्याचा अंदाजानुसार संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. मुंबई पुण्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात देखील पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली दिसत आहे. शेतकऱ्यांची संथ गतीने सुरू असलेली पेरणीची कामे या पावसामुळे वेगाने सुरू होतील असे देखील सांगण्यात येत आहे.