सोलापूर शहर परिसरास जलधारांनी केले चिंब : संततधार पावसाने दुसऱ्या दिवशीही सूर्यदर्शन नाहीच….

संतत जलधरांनी सोलापूरकरांना केले चिंब ! 

दुसऱ्या दिवशीही सूर्यदर्शन नाहीच…

प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. २ सप्टेंबर – सोलापूर शहर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशीही शहर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच होती. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात जोराचा आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा ईशारा देण्यात आला होता. त्यानुसार शहर परिसरात दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरूच होता, दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. रविवार पासून सुरू असलेला पाऊस सोमवारी ही सुरूच होता. काहीकाळ विश्रांती घेऊन वरुणराजा पुन्हा बरसत आहे.

 दरम्यान संततजलधारांनी सोमवारी मात्र चाकरमान्यांना आणि शाळकरी मुलांना भिजवून सोडले. सकाळ पासूनच शहरात जोराचा पाऊस कोसळण्यास सुरुवात झाल्याने सर्वांची त्रेधातिरपीट उडाली.

रेनकोट आणि छत्रीचा आधार घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह शाळा गाठली, तर चाकरमान्यांनी देखील रेनकोट घालून कामास जाण्यास पसंती दर्शवली. सोलापूरवासियांना सलग दोन-तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाची सवय नसल्याने अनेकांना हा पाऊस नकोसा वाटू लागला आहे. दुसऱ्या दिवशी ही सूर्यनारायणाचे दर्शन झाले नागरिकांना जलधारांचा सामना करावा लागला.

गणरायाच्या स्वागतासाठी वरुणराजाची हजेरी….

गणरायाच्या स्वागतासाठी वरुणराजा स्वतः हजर झाला आहे. असेच चित्र शहरात दिसून येत आहे. हवामान विभागाने अंदाज व्यक्त करत सप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळेल, असे सांगितले होते. हवामान खात्याचा अंदाजानुसार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आणखीन दोन दिवस असाच पाऊस पडणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *