सोलापुरातील वाचन चळवळ आणि संस्कृती वाढावी यासाठी प्रिसिजनचा पुढाकार : डॉ.सुहासिनी शहा
प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमास सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद ; दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी घेणार वाचन कार्यक्रम
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ७ जुलै – पुस्तके वाचक लोकांचा समूह बनवून सोलापुरातील वाचन चळवळ वाढावी या अपेक्षेने या प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमाची सुरुवात केली आहे, असे मत प्रिसिजन फाउंडेशनच्या प्रमुख डॉ. सुहासिनी शहा यांनी व्यक्त केले.प्रिसिजन फाउंडेशन आणि आयएमए सोलापूर यांच्या संयुक्त माध्यमातून आयोजित प्रिसिजन वाचन अभियानात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ‘वॉकिंग ऑन द एज’ पुस्तकाचे लेखक प्रसाद निक्ते, आयएमए संघटनेच्या डॉ.किरण सारडा ,आनंद अवधानी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमात डॉ. सुमेधा कंदलगावकर यांनी वॉकिंग ऑन द एज पुस्तकाचे अभिवाचन प्रेक्षकांसमोर सादर केले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी डॉ.सुहासिनी शहा बोलताना म्हणाल्या कि, प्रिसिजन गप्पांच्या समूहाप्रमाणेच प्रिसिजन वाचन समूह वाढवण्यासाठी , वाचन संस्कृती जोपासण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आयएमए हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले.त्याचप्रमाणे आय.एम.एच्या डॉ. किरण सारडा यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाच्या आयुष्यावर मित्र आणि पुस्तकांचा मोठा प्रभाव असतो म्हणूनच पुस्तकांनाच मित्र बनवावे, वाचनाच्या माध्यमातून मनाचा व्यायाम करावा या मनातील सुप्त इच्छेला मूर्त स्वरूप मिळाल्याचा आनंद झाल्याचे सांगितले.
दरम्यान वॉकिंग ऑन द एज पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर प्रकाशक आनंद अवधानी यांनी आपल्या मनोगतात कुठलीही गोष्ट दोन बाबींवर अवलंबून असते एक म्हणजे इमॅजिनेशन आणि दुसरी इम्प्लिमेंटेशन या दोन्ही गोष्टी वाचन अभियानासही लागू आहेत असे सांगतानाच प्रिसिजन आणि आयएमएच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रत्येक शहराच्या आर्थिक प्रगती बरोबरच सांस्कृतिक वैभव आता देखील वाढ झाली नाही तर शहराचे अधोगतीकडे वाटचाल होत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले शहराचे सौंदर्य हे वाचन संस्कृती वाढविण्यावरच अवलंबून आहे त्यासाठी प्रिसिजन , आयएमएने घेतलेला पुढाकार हा प्रत्येकाने स्वतः घेतलेला पुढाकार आहे समजून काम केल्यास सोलापूरला नवीन ओळख जागतिक स्तरावर मिळेल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यानंतर वॉकिंग ऑन द एज पुस्तकाचे लेखक प्रसाद निकते यांनी सदरचा प्रवास का करावासा वाटला त्या प्रश्नाचा उलगडा करत सातपुडा पर्वत ते सह्याद्री पर्वत रांगांच्या ७५ दिवसातील हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवासाच्या आठवणींना मुलाखतीच्या माध्यमातून उजाळा दिला. आदिवासी भागातील अनोख्या कहानी गोष्टी तसेच काही विशेष घडामोडी , घटनांवर प्रकाशझोत टाकत प्रेक्षकांना प्रवासाबद्दल इत्यंभूत माहिती दिली. ७५ दिवसांच्या प्रवासात वेगवेगळ्या लोकांनी केलेली मदत व प्रवासात आलेले अनुभव यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितले. तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील निकते यांनी उत्तरे देत कार्यक्रमात रंगत आणली. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक निकते यांची मुलाखत माधव देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीधर खेडगीकर यांनी केले. यावेळी सोलापूर शहरातील वाचक प्रेमी तसेच रसिक प्रेक्षक उपस्थित होते.