आपले संविधान आपला अभिमान संविधान भवन अडकले श्रेयवादात आ.कोठेंच्या पत्रानंतर “प्रयास”ने व्हायरल केले निवेदनासह निवेदन

प्रयत्नांना यश : ‘प्रयास’ संस्थेच्या नार्थकोट मैदानावर संविधान भवनाला मंजुरी
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे असलेल्या नार्थकोट मैदानावर देशातील पहिले संविधान भवन उभारण्यात येणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय कौशल्य, विकास, रोजगार आणि संशोधन मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांनी नुकताच जाहीर केला. या निर्णयामुळे सोलापूरकरांच्या हक्काचा व लोकहिताचा प्रश्न सुटला असून, यामागे ‘प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सोलापूर’ यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

*‘प्रयास’ची दीर्घकाळची लढाई यशस्वी*
संविधान भवन हे सोलापूरकरांचे स्वप्न. मात्र या प्रकल्पासाठी आवश्यक जागा हस्तांतरित करण्याचा प्रशासकीय अडथळा दीर्घकाळ प्रलंबित होता. याच पार्श्वभूमीवर ‘प्रयास’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी वर्षानुवर्षे सातत्याने पाठपुरावा केला.मनपा, राज्य शासन, रोजगार व कौशल्य विभाग, उद्योग मंत्रालय आदी स्तरावर पत्रव्यवहार, प्रस्ताव, भेटीगाठी अशा सर्व पातळ्यांवर ‘प्रयास’ कार्यरत राहिले. संस्थेने न थकता केलेल्या सततच्या मागण्या, जनहितार्थ आवाज आणि सामाजिक दडपणामुळे शासनाने अखेर हा ऐतिहासिक निर्णय घेतला.
*आमदार देवेंद्र (दादा) कोठे यांचा पाठपुरावा*
लोकप्रिय आमदार देवेंद्र दादा कोठे यांनीही या निर्णयासाठी प्रामाणिकपणे पाठपुरावा करत शासन यंत्रणेवर योग्य दडपण आणले. त्यांच्या पाठिंब्यामुळे ‘प्रयास’च्या प्रयत्नांना बळ मिळाले.
सोलापूरला नवे वैभव प्राप्त होणार
नार्थकोट मैदानावर होणारे संविधान भवन हे सात मजली भव्य इमारत असणार आहे.
•संविधान विषयक संशोधन
•विशाल ग्रंथालय
•अभिलेखागार
•शैक्षणिक व सामाजिक उपक्रम
•प्रदर्शन गॅलरी
• ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपणारे उपक्रम
रुजू होणार आहेत. संविधानाचा अभ्यासकेंद्र आणि प्रेरणास्थळ म्हणून हे भवन देशपातळीवर सोलापूरची नवी ओळख निर्माण करणार आहे.
*’प्रयास’चा अभिमानाचा क्षण*
‘प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था’ नेहमीच समाजाच्या वंचित घटकांसाठी लढत आली आहे. शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवक मार्गदर्शन अशा अनेक क्षेत्रांत कार्य केलेल्या या संस्थेने आता सोलापूरकरांच्या अभिमानाचा प्रकल्प उभा करण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.
“संविधान भवन हे फक्त एक इमारत नसून, ते सोलापूरकरांच्या हक्काचा विजय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे स्मारक आहे. यामध्ये प्रयत्नशील नागरिकांचा, जनतेच्या लढ्याचा आणि लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याचा मोठा वाटा आहे.”
आजवर शासन पातळीवरील कागदोपत्री प्रक्रियेच्या जोखडात अडकलेले स्वप्न, ‘प्रयास’ संस्थेच्या धडपडीमुळे साकार होऊ लागले आहे. लवकरच संविधान भवनाचे काम सुरू होणार असून, सोलापूरचे नाव देशाच्या इतिहासात नवी ओळख निर्माण करणार आहे.
सचिन शिंदे, प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष