प्रभाग ६ मधील विरोधकांची दादागिरी मोडीत काढणार ; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा ;

प्रभाग ६ मधील विरोधकांची दादागिरी मोडीत काढणार ; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा ;

साठे पाटील वस्तीला विकासाचे मॉडेल बनविणार 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर दि.१२ जानेवारी

प्रभाग क्रमांक ६ मधील साठे पाटील वस्तीमध्ये पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी सांगितलेल्या समाज मंदिर, अंतर्गत रस्ते,पाणीपुरवठा, महिलांसाठीचे सुसज्ज शौचालय आणि नाल्यावरून येण्याजाण्यासाठी पूल बांधण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. समाज मंदिरासाठी ५० लाख निधी देऊ. कामाचे उद्घाटन सुद्धा आपणच करणार आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे लोकार्पणाची फीतसुद्धा आपणच कापणार, अशी ग्वाही देत प्रभाग क्रमांक ६ मध्ये विरोधकांकडून सुरू असलेली दादागिरी मोडीत काढण्याचा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक ६ मधील उमेदवार पॅनल प्रमुख गणेश वानकर, सुनील खटके,सोनाली गायकवाड आणि मृण्मयी गवळी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सोमवारी सायंकाळी साठे पाटील वस्तीमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या परिसरात नगरसेवक असताना गणेश वानकर यांनी मोठ्या प्रमाणावर कामे केलेलीच आहेत. मात्र आता त्यांनी ज्या काही अडचणी सांगितल्या, त्या अडचणी आपण शंभर टक्के पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. विरोधकांना इशारा देतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्याज बट्टावाल्यांची दादागिरी खपवून घेणार नाही. व्यवसायच काढून घेऊ असा इशारा दिला. केंद्रात राज्यात भाजपाची सत्ता आहे. आता सोलापूर महानगरपालिकेत सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार असल्यामुळे प्रभाग क्रमांक ६ मधील विकासाला निधी कमी पडू देणार नाही. विरोधक येतील मते मागतील, पण नेमके आपण काय काम केले, हे मात्र ते सांगू शकणार नाहीत. त्यामुळे शतप्रतिशत भाजप आणि लाडक्या बहिणींच्या जोरावर सोलापूर महानगरपालिकेत आपकी बार ७५ पार भाजप निश्चितच करेल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. साठे पाटील वस्तीमध्ये एकेकाळी येण्यासाठी रस्ते नव्हते, चांगली ड्रेनेज लाईन नव्हती, पिण्याच्या पाण्याची तर अवस्था अत्यंत बिकट होती. संपूर्ण अंधाराचे साम्राज्य होते. महिलांना शौचालयं उपलब्ध नव्हती. मात्र या भागात आपण ही सर्व कामे १०० टक्के पूर्ण केली असल्यामुळेच जनतेने पुन्हा एकदा आपल्याला महानगरपालिकेत पाठवायचा निर्णय घेतला असल्याचे, भाजपचे पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले. आमदार विजयकुमार देशमुख यांनी या प्रभागाच्या विकासकामांसाठी कोट्यवधीचा निधी दिला असल्याचे सुनील खटके यांनी सांगितले.

दरम्यान पालकमंत्री गोरे यांनी प्रचाराच्या दरम्यान प्रभाग क्रमांक सहा मधील बल्लारी चाळ येथील नागरिकांशी संवाद साधला आणि अडचणी समजून घेतल्या आणि त्या अडीअडचणी सोडविण्याचा शब्दही त्यांना दिला.

या बैठकीला ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांच्यासह साठे – पाटील वस्ती व थोबडे वस्ती मधील ज्येष्ठ नागरिक अशोक कुंभार, अरुण आवताडे महाराज, किसन पवार, नाना गरड,नारायण बचूटे,उमेश कांबळे,अस्लम पटेल, महादेव गवळी,अजय डिगोळे,आशिष डिगोळे, अरुण जाधव, विजय घुले,सागर डोके, रफिक पटेल,राजू पवार, विठ्ठल मेट्रे,संदीप काशीद, बाळासाहेब गवळी, व परिसरातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

उद्योजक राजू डोंगरे यांचा भाजपच्या पॅनलला पाठिंबा !

पापड उद्योगाच्या माध्यमातून हजारो महिलांच्या हाताला काम मिळवून देणारे लक्ष्मी पापड उद्योग समूहाचे संस्थापक राजू डोंगरे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक सहा मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला पालकमंत्री गोरे यांनी त्यांचे स्वागत केले महिलांच्या हाताला जास्तीत जास्त काम मिळण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न हवेत अशी अपेक्षा राजू डोंगरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *