बंद पडलेल्या एसटी बसला प्रवाशांचा दे धक्का….

सोलापूर व्हिजन :- एसटी बसला प्रवाशांचा दे धक्का….सोलापूर :- प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यातील परिवहन विभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या एसटी बसेसची अवस्था सध्या खूप वाईट झालेली आहे. एसटीच्या छताला छिद्र पडून पावसात पाणी गळणारी एसटी पहिली असेल , पत्रांचे ठिगळ लावून ते छिद्र बंद केलेली एसटी पहिली असेल , यानंतर आता एसटी बसेस कधी, केव्हा , कुठे बंद पडेल हे देखील चित्र सध्या सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी सकाळी दिसून आले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या करामतीचे दृश्य पाहून शहरवासीय चकित झाले. ऐन छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणीच एसटी बंद पडल्याने प्रवाशांना एसटी मधून उतरून धक्का मारावा लागला. प्रवाशांची काळजी वाहणारी एसटी बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एसटी बसेस अशा रीतीने अचानक रस्त्याच्या मध्येच बंद पडत असल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे.

 

दरम्यान एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवातला यामुळे धोका निर्माण होत आहे. एसटी बसेस मध्ये बिघाड निर्माण होत असेल तर अशा एसटी रस्त्यांवर उतरवू नये आणि प्रवाशांच्या जीवितला धोका निर्माण होईल यासाठी कारणीभूत ठरू नये अशी खंत बार्शी डेपोची बस रस्त्याच्या मधोमध बंद पडल्यानंतर प्रवाशांनी एसटी बसला धक्का देताना व्यक्त केली. यापूर्वी देखील परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसची अवस्था काही चांगली नव्हती. परंतु आता नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाच्या बसेस आल्या आहेत त्यामध्ये इलेक्ट्रिक बसेसचा देखील समावेश आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे आधुनिक होत असलेल्या महामंडळात अजूनही जुनाट बसेस रस्त्यावर धावत आहेत. अशा तांत्रिक बिघाड असलेल्या बसेस महामंडळाच्या ताफ्यातून काढून प्रवाशांच्या संरक्षणाचा विचार करावा अशी मागणी केली जात आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी याच एसटीतून प्रवास करतात मात्र अशावेळी एसटीच असुरक्षिततेचे कारण बनत असेल तर प्रवाशांनी विश्वास कसा ठेवावा असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *