फॉर्मुला जुना की नवा रंगली चर्चा ; पालकमंत्री जयाभाऊंच्या एंट्रीने बाजार समिती निवडणुकीत ट्विस्ट ?

पालकमंत्री जयाभाऊंच्या एंट्रीने बाजार समिती निवडणुकीत  ट्विस्ट ?

 फॉर्मुला जुना की नवा रंगली चर्चा; दोन्ही देशमुख, कल्याणशेट्टी, माने, हसापुरेंच्या भूमिकेकडे लक्ष !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

 सोलापूर, दि.४ एप्रिल-

विक्रमी उलाढालीसाठी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती वर्चस्व राखण्यासाठी जिल्ह्यातील नेते मंडळींनी निवडणुकीची व्यूव्हरचना आखण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या एन्ट्रीने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. माजी पालकमंत्री तथा बाजार समितीचे माजी सभापती आ. विजयकुमार देशमुख, माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी सभापती दिलीप माने, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

सहकारी संस्थांमधील निवडणुकांमध्ये राजकीय पक्षाच्या चिन्हाऐवजी स्थानिक युती-आघाड्या करून नेते मंडळी मैदानात उतरतात. बाजार समितीवरील प्रशासक राज आता संपणार असून बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय सारीपाटास वेगाने सुरुवात झाली आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर बाजार समिती निवडणुकीची अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता राजकीय घडमोडीला मोठ्या प्रमाणात वेग येणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचे संकेत देतानाच आ. सुभाष देशमुख यांनी भाजपाच्या कार्यकत्यांना घेवून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे सूतोवाच केले आहे. तर आ. विजयकुमार देशमुख देखील लवकरच या मैदानात दिसण्याची शक्यता आहे. बाजार समितीचे माजी सभापती दिलीप माने यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करून भोजनाचा आस्वाद घेत निवडणूक रंगतदार होणार असे संकेत दिले आहेत.

वर्षेनुवर्षे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. परंतु गेल्या काही वर्षात भाजपाने केंद्र, राज्यासह सहकारी संस्थांवर देखील वर्चस्व राखायला सुरुवात केली आहे. पक्षचिन्ह बाजूला ठेवून जिल्हा व तालुका पातळीवरील राजकीय वर्चस्व जपण्यासाठी लोकप्रतिनिधी स्थानिक नेतेमंडळींना घेवून बाजार समितीच्या निवडणुकीत मोर्चेबांधणी करीत असले तरी या निवडणुकीला पक्षीय राजकारणाचा वास येतोच. बाजार समितीच्या गत निवडणुकीवेळी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख आणि राज्याचे तत्कालीन सहकार मंत्री यांच्या पॅनलमध्ये ही निवडणूक रंगली आणि पालकमंत्र्यांनी बाजार समितीवर वर्चस्व राखले होते. यंदा मात्र जिल्ह्याला उपरा पालकमंत्री असल्याने जिल्ह्यातील राजकारणाबाबत त्यांची भूमिका काय असणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपाच्या आमदारांमधील बेकीवर तोडगा काढत पालकमंत्री त्यांच्यात एकी घडवून काही चमत्कार करतात का? हे महत्वाचे आहे. तर दोन्ही देशमुख या निवडणुकीत एकत्र दिसणार का? आ. कल्याणशेट्टी यांना सोबत घेत भाजपाच्या आमदारांनी एकीची मोट बांधल्यास बाजार समितीवर भाजपाचे कमळ फुलू शकते. परंतु हा चमत्कार घडण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

आता सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात भाजपाचे आमदार एकत्र येत भाजपाच्या कार्यकर्त्यांना बाजार समितीवर सत्तेची संधी देणार का हे देखील पहावे लागणार आहे. आ. सुभाष देशमुख यांनी जाहीरपणे सांगितले की, भाजपासाठी सर्व काही आणि कार्यकत्यांसाठीच ताकतीने ही निवडणूक लढविणार आहे. हीच भूमिका पालकमंत्री आणि भाजपाचे इतरही आमदार घेणार का? याची देखील सर्वांना उत्सुकता आहे. असे न झाल्यास काँग्रेसच्या नेत्यांना सोबत घेवून भाजपाचा एक गट पुन्हा बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी रणणिती आखणार का हे देखील पहावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात काँग्रेसला उतरती लागली असून बाजार समिती जर का संपूर्ण भाजपाची झाली तर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना मोठा झटका बसणार आहे. जर का भाजपा विरुध्द काँग्रेस अशी लढत जर बाजार समितीमध्ये लागली तर काय होणार, याचीही चर्चा रंगली आहे. हे सर्व नेते एकत्र येत जागा वाटून घेत निवडणुका टाळून ही निवडणूक बिनविरोध करतील का ही देखील अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. बाजार समिती निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. परंतु त्या शेतकऱ्याला बाजार समितीच्या माध्यमातून न्याय मिळतो का? हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत चर्चीला जाणे गरजेचे आहे. बाजार समितीवर सत्तेसाठी राजकारण करणे आणि निवडणुकीत साम-दाम-दंड वापरत सत्ता काबिज करणे आणि शेतकरी हिताकडे दुर्लक्ष करणे असे होणे दुर्दैवी ठरेल. बाजार समितीत शेतीमाल घेवून येणारे शेतकरी, व्यापारी, आडते, हमाल-मापाडी या सर्वांना योग्य न्याय देण्यासाठी बाजार समितीच्या सत्तेचा वापर होणे गरजेचे आहे.

दिलीप मानेंनी मित्रासाठी केला आमरस-पुरीचा बेत !

आमरस छान झाला आहे, गोड आणि तेवढाच टेस्टी आहे… असे म्हणत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचे जुने सहकारी तथा माजी आमदार दिलीप माने यांच्या घरी भोजन केले. यावेळी माने यांनीही आमरस टेस्टी आहे तर… आणखीन घ्या की राव… असा आग्रह करीत सोलापूरकरांच्या वतीने पालकमंत्र्यांचे चांगलेच आदरातिथ्य केले. या स्नेहभोजनानंतर बाजार समिती निवडणूक आणि इतरही राजकीय घडामोडींवर गप्पा रंगल्याची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळातून होती. राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, बार्शीचे ठाकरे शिवसेनेचे आम दार दिलीप सोपल यांची उपस्थिती लक्षवेधक होती.आमरसामुळे सर्वपक्षीय गोडवा पाहायला मिळाला.जेवणानंतर पत्रकारांनी आमदार सोपल यांना आमरस गोड होता का? असे विचारले असता आमरस हा गोडच असतो परंतु हा आमरस अधिकच टेस्टी होता, देवगड हापूसचा होता ना? असे नेत्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.तत्कालीन सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख यांच्या पॅनलमध्ये ही निवडणूक रंगली आणि पालकमंत्र्यांनी बाजार समितीवर वर्चस्व राखले होते. यंदा मात्र जिल्ह्याला उपरा पालकमंत्री असल्याने जिल्ह्यातील राजकारणाबाबत त्यांची भूमिका काय असणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपाच्या आमदारांमधील बेकीवर तोडगा काढत पालकमंत्री त्यांच्यात एकी घडवून काही चमत्कार करतात का? हे महत्वाचे आहे. तर दोन्ही देशमुख या निवडणुकीत एकत्र दिसणार का? आ. कल्याणशेट्टी यांना सोबत घेत भाजपाच्या आमदारांनी एकीची मोट बांधल्यास बाजार समितीवर भाजपाचे कमळ फुलू शकते. परंतु हा चमत्कार घडण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *