‘लाडकी बहीण’ फॅक्टर महायुतीला तारणार”- पालकमंत्री चंद्रकांत पाटील..!
* महायुतीचे राज्यात १७० ते १८० आमदार होणार विजयी
* दोन्ही देशमुखांनाच उमेदवारी फिक्स
* लाडकी बहीण योजना ठरणार लाभदायक
* मराठी भाषेला अभिजात दर्जा
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.४ ऑक्टोबर-राज्यात लोकप्रिय झालेली लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरणार असून राज्यात महायुतीचे १७० ते १८० आमदार विजयी होतील, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. घटस्थापने निमित्त ते काल सोलापूर दौऱ्यवर आले होते. सर्वप्रथम त्यांनी सोलापूरची कुलस्वामिनी

श्रीरुपा भवानी मातेचे दर्शन घेऊन देवी मातेस साकडे घातले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजकारणावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. याप्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, मोहन डांगरे उपस्थित होते. यावेळी सोलापूर शहर जिल्ह्याच्या राजकारणावर भाष्य करताना शहरातील विद्यमान आमदार आ. सुभाष देशमुख आणि आ. विजयकुमार देशमुख यांनाच भाजपाकडून पुन्हा उमेदवारीचे संकेतही त्यांनी दिले.
मराठीला अभिजात दर्जा; चंद्रकांतदादांचा आनंद द्विगुणीत
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार असल्याचे सांगत उच्च शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला आनंद द्विगुणीत केला. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक असल्याचे सांगताना पालकमंत्री पाटील म्हणाले, ही गोड बातमी मला दैनिक तरण भारतच्या कार्यालयात मिळाली आहे. महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल, अशी बातमी ऐकून आनंद झाल्याचे दादा म्हणाले.
औपचारिक गप्पा मारताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल भाजपालाच असल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरुन सिध्द होते. अगदी ३-४ हजार ते १० हजाराच्या फरकाने भाजपाच्या १० खासदारकीच्या जागा पडल्या. विरोधकांनी तयार केलेल्या फेक नरेटिव्हचा फटका बसला. विधानसभा निवडणुकीत मात्र आम्ही प्रत्येक बुथनिहाय मायक्रोप्लॅनिंग तयार केल्याने महायुतीच्या १७० ते १८० जागा निवडून येतील. महायुतीचे जागा वाटप देखील अंतिम टप्प्यात आले आहे.

आमच्या सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना सक्षमपणे चालू केल्या आहेत. इतकेच नाहीतर शेतकरी, कामगार व वंचित घटकांसाठीही विविध योजना यशस्वीपणे राबविलेल्या आहेत. मुलींसाठी सर्वप्रकारचे उच्च शिक्षण मोफत केले आहे. विधानसभेत महायुतीतील सर्व पक्षांचे सध्या दोनशेच्यावर आम दार आहेत. लाडकी बहिण योजना तर महायुतीसाठी गेमचेंजर असून आगामी निवडणुकीत महायुतीचीला एकहाती सत्ता मिळणार असाही विश्वासपूर्वक दावा पालकमंत्री पाटील यांनी केला. निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता केव्हाही लागली तरी महायुती निवडणुकीसाठी तयार असल्याचेही त्यांनी एवढी सांगितले.