ड्रेनेजच्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात ; स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष…
श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांनी दिला महापालिकेवर मोर्चा काढण्याचा दिला इशारा….
सोलापूर व्हिजन
सोलापूर, दि. २२ ऑगस्ट – हैद्राबाद रोडवरील जुना विडी घरकुल चंद्रोदय कोटा नगर भाग दोन येथे ड्रेनेजच्या सांडपाण्यामुळे रहिवासियांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील स्थानिक रहिवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ड्रेनेज लाईन नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी भर रस्त्यावर वाहत आहे हेच पाणी स्थानिक नागरिकांच्या घरात शिरत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे…
याठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अक्षरशः दुर्गंधी आणि सांडपाण्यात राहण्याची वेळ आली आहे. ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर आल्याने रोगाराईला आमंत्रण देणारे डेंग्यूचे मच्छर या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे अबालवृद्ध नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. घरासमोर सांडपाण्याचे तळे साचत असल्याने हे सांडपाणी सकाळ संध्याकाळ वारंवार स्वतः नागरिक काढत असल्याने गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान याबाबत सोलापुर महापालिकेला वारंवार तक्रारी करून देखील ड्रेनेजच्या सांडपाण्याचा प्रश्न सुटत नाही. तात्पुरत्या स्वरूपात कामे केली जातात परंतु कायमस्वरूपी तोडगा महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकारी काढत नसल्याने रहिवासियांमधून प्रशासनाच्या नियोजनशून्य कामकाजावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढू
सोलापूर शहरात डेंगू सारखे आजार वाढत असताना महापालिकेने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना याठिकाणी भेट देण्याची मागणी केली आहे. अन्यथा महापालिकेवर नागरिकांना घेऊन मोर्चा काढू.
– श्रीनिवास संगा, संस्थापक अध्यक्ष श्री प्रतिष्ठान सोलापूर.
श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांनी या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन यासंदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करून ड्रेनेजलाईनचे काम आपण महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत करून घेऊ असेही ते म्हणाले. घाण पाणी आमच्या घरात येत असल्याने आमचे जगणे असह्य झाले आहे प्रशासनाचे कर्मचारी येतात फोटो काढून घेतात तेवढ्यापुरते काम करुन जातात पुन्हा पाऊस पडला तर आहे तसाच अडचण सुरुवात होतात. या ड्रेनेजच्या पाण्याची समस्या तसेच आहे प्रशासनाने लवकरात लवकर ही समस्या सोडवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नाहीतर महापालिका प्रशासनाने कर वसूल करणे बंद करावे
स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीत हे बाब गंभीर आहे आता महापालिका आयुक्तांनी आमची समस्या सोडवावी ही आमची प्रमुख मागणी आहे. जर ही समस्या सुटत नसेल, मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असेल तर महापालिका प्रशासनाने कर वसूल करणे बंद करावे.
– स्थानिक रहिवासी.