जो पेन्शन की बात करेगा ; वही देश पे राज करेगा ! शिक्षकांच्या विराट आंदोलनाने सरकारला घेरले.. 

जो पेन्शन की बात करेगा ; वही देश पे राज करेगा ! 

शिक्षकांचे विराट आंदोलन सरकारला येणार टेन्शन….?

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर , दि. २५ सप्टेंबर – जुनी पेन्शन सुरू करणे, संच मान्यता जाचक अटी रद्द करणे, कंत्राटी शिक्षक भरती रद्द करणे अशा महत्त्वाच्या मागण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील शिक्षकांनी भव्य असा विराट आक्रोश मोर्चा काढून राज्य सरकारला जोर का झटका दिल्याचे पाहायला मिळाले. “जो पेन्शन की बात करेगा ; वही देश के राज करेगा!” असे फलक हाती घेऊन घोषणा देत विराट आक्रोश  मोर्चा जिल्हाधिकार्यालयाकडे मार्गास्थ झाला.

        सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन हा मोर्चा काढला. शहरातील हुतात्मा चौक येथे चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून निघालेला हा मोर्चा दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या उपोषण प्रवेशद्वारासमोर आला. येथे या मोर्चाचे रूपांतर भव्य अशा सभेमध्ये झाले. यावेळी मोर्चामध्ये “एकच मिशन जुनी पेन्शन” ” जो पेन्शन की बात करेगा ; वही देश के राज करेगा ! ”  अशी जोरदार घोषणाबाजीने सारा परिसर दुमदुमून सोडला. दरम्यान मोर्चा मधील सहभागी शिक्षकांनी जुनी पेन्शन आमच्या हक्काची असल्याचे सांगत विविध मागण्या मांडल्या. यावेळी शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी , सदस्य आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन शिक्षकांनी सरकारवर साधला निशाणा..

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकारी आणि शिक्षक सदस्यांनी आपली पुन्हा एकदा प्रलंबित जुनी पेन्शनची मागणी सरकार दरबारी लावून धरली आहे. सरकारने जर यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर, निवडणुकीनंतर वेगळे चित्र दिसेल असा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांनी राज्य सरकारवर आणि राज्यकर्त्यांवर निशाणा साधत, सरकारला जोरका झटका धीरे से देऊन, सरकारचे टेन्शन वाढवलेले आहे. 

सरकारने आमच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात……

जुनी पेन्शन शिक्षकांना लागू व्हावी ही आमची प्रलंबित आणि पहिल्यापासूनची मागणी आहे. त्याच पद्धतीने संच मान्यता मधील जाचक अटी रद्द करणे, कंत्राटी शिक्षक भरती रद्द करणे, यादेखील मागण्या तात्काळ पूर्ण व्हाव्यात अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारला त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील.

सुरेश पवार , शिक्षक समन्वय समितीचे सदस्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *