सोलापूर जिल्ह्यात नव्या विषाणूचा प्रादुर्भाव नाही : जिल्हा आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण…
जिल्ह्यात एचएमपीव्ही विषाणूचे सर्वेक्षण सुरू : डॉ. संतोष नवले
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.०८ जानेवारी
नव्या एच.एम.पी.व्ही या विषाणूजन्य आजाराचा चिनमध्ये मोठया प्रमाणात उद्रेक सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या विषाणूजन्य आजाराचा जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नसल्याचे स्पष्टीकरण सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील ८० प्राथमिक आरोग्य केंद्र व ४३४ उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात या आजाराबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. सतत खोकला, शिंका, ताप ही लक्षणे असल्यास रुग्णांनी तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रात उपचार घ्यावेत. आजार अंगावर काढू नये, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
- व्हायरस पासून घ्यावयाची काळजी
सतत खोकला किंवा शिंका, येत असतील तर तोंड आणि नाक रुमाल किंवा टिशू पेपरने झाका, साबण किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर ने आपले हात वारंवार धुवा, ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा, भरपूर पाणी प्या, पौष्टिक आहार घ्या, संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्यावी.
- व्हायरस पासून संरक्षणासाठी हे करू नका
हस्तांदोलन, टिशू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे, सार्वजनिक ठिकाणी भुंकणे, डॉक्टरांच्या सल्लल्याशिवाय औषध घेऊ नका.
- घाबरू नका काळजी घ्या
चीनमधून आलेल्या नवीन विषाणू आजाराबाबत काळजीचे कोणतेही कारण नाही. याबाबत जिल्ह्यात आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सर्वेक्षण अधिक गतिमान करून सर्दी-खोकला असलेल्या रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या आजारासंदर्भात नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र दक्षता घ्यावी.
– डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी