राज्य सरकारने जनतेच्या डोळ्यात केली धूळफेक
महागाई आणि शेतकरी प्रश्नावरून हर्षवर्धन पाटील यांनी सरकारला घेरले …
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ एप्रिल
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकर्यांची कर्जमाफी करण्याचे वचन दिले होते. परंतु निवडणुकीनंतर एक हाती सत्ता प्राप्त होताच महायुतीच्या सरकारला आपल्या वचननाम्याचा विसर पडला असून आता तर त्यांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीपासून पळ काढला आहे. वेगवेगळी कारणे सांगून लाडक्या बहिणींनाही त्यांनी दूर केले आहे, अशी टीका माजी सहकारमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निरीक्षक हर्षवर्धन पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारवर केली. शुक्रवारी, डफरीन चौकातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्यांवरून सरकारवर टीकेची झोड उठविली. या बैठकीला पक्षाचे निरीक्षक आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार अभिजित पाटील, उत्तम जानकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, भारत जाधव, माजी महापौर अॅड.यू.एन.बेरिया, मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, अनिल सावंत, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार उपस्थित होते.
राज्य सरकारचे मंत्री विविध विषयावरुन उलटसुलट मुद्दे उपस्थित करून जनतेत तेढ निर्माण करीत आहेत. खरे तर राज्यातील जनता महागाई, बेरोजगारीला वैतागली असून या विषयावर बोलण्याऐवजी सरकारमधील मंत्री वेगळ्याच विषयावर बोलून मूळ मुद्याला बगल देत आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर शेतकरी कर्जमाफीच्या विषयावरून शेतकर्यांचा अवमान केला आहे. याशिवाय या सरकारशी संबंधित असलेले कुणीही उठते आणि इतिहासाची मोडतोड करून आपापल्या सोयीप्रमाणे इतिहास सांगून तेढ निर्माण केला जात आहे. ही पध्दत समाजाला घातक असून सरकारने याविषयी मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत. इतिहासाचा अभ्यास असणार्यांनीच बोलावे असे नियम करावेत, म्हणजे काहीही बोलण्याच्या अपप्रवृत्तीला आळा बसेल, असेही पाटील म्हणाले.
पक्षाच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल चिंतन करून कारणे शोधण्यात आली. तसेच पक्षबांधणीच्या दृष्टीने पुढील व्यूहरचना करण्यात आली असल्याचे सांगून पाटील यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. स्वभावावर सरकार चालत नाही तर ते घटनेप्रमाणे चालवावे लागते. निवडणुकीपूर्वीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण आदी विविध योजना जाहीर करण्यात आल्या. परंतु सत्तेवर आल्यानंतर या योजनांच्या अंमलबजावणीविषयी सरकारने ठोस निर्णय घेतला नाही. आता वेगवेगळी कारणे सांगून लाडक्या बहिणींनी योजनेतून बाहेर काढले जात आहे. राज्यात वीज, पाणी टंचाईचा प्रश्न जटील बनला आहे. मजुरांना काम नाही, गॅस सिलेंडरच्या दरवाढीनंतर महागाई गगनाला भिडली आहे. जनतेला याचा प्रचंड त्रास होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनीही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
शरद पवार यांचा दौरा रद्द
सोलापूर शहरात शिक्षणमहर्षी चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी शरद पवार सोलापूर दौऱ्यावर येणार होते. परंतु त्यांचा नियोजित दौरा अखेर रद्द झाल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. त्यामुळे सदरचा अनावरण सोहळा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. साताऱ्यातून शरद पवार हा अनावरण सोहळा ऑनलाईन पद्धतीने संपन्न करणार असल्याचे पक्षाचे निरीक्षक व प्रभारी यांनी सांगितले आहे.
मानापमान नाट्य
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत मान सन्मानावरून नाराजी नाट्य घडले. पक्षाचे शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख यांना बसण्यासाठी खुर्ची दिली नसल्याने ते पदाधिकार्यांवर चांगलेच संतापले होते. पक्षाच्या पदाधिकार्यांत ताळमेळ, एकी नसल्याचा आरोप करून शेख हे बैठकीतून निघून गेले.