प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसमोर गटबाजीचा रंगला ‘सोलापुरी तमाशा’;
मेळाव्यात उणी-दुणी अन् हेवा-देव्यांचे फुटले ‘पॉवर’ बॉम्ब!

दणाणलं स्मृती मंदिर; उपस्थितांच्या बसल्या कानठाळ्या
▶ शहराध्यक्ष संतोष पवारांनी उमेश पाटलांविरुद्ध तोफा डागत ओकली मनामधील खदखद
▶ पवारांनी अध्यक्षांसमोर सोडलेले टिकेचे बाण धुडकावत उमेश पाटलांची तडाखेबाज भाषणबाजी
▶ वर्चस्वाच्या घनघोर लढाईमधील ‘तु… तु..मै.. मै.., तु बडा या मै बडा’च्या महानाट्यात ‘स्थानिक’च्या निवडणुकीसाठी रंगला मेळावा
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
सोमवार (ता.२१) सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचा पदाधिकाऱ्यांसाठी ‘निर्धार जव पर्वांचा’ हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर गटबाजीचा ‘सोलापुरी तमाशा’ प्रचंड रंगला. संतोष पवार आणि उमेश पाटील या दोया मातब्बर नेत्यामधील दफळी प्रकर्षाने वा निमित्ताने, उफाळलेली दिसली. गटबाजीच्त्वया प्रदर्शनात पाटील आणि पवार यांनी उणीदुणी अन् हेवा देव्यांचे ‘पॉवर’ बाज बॉम्बगोळे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्यासमोर फोडले. एवढ्याच न थांबता उपस्थित सर्वांसमोर थेट तक्रारींचा पाढा प्रदेशाध्यक्षांसमोरच वाचला गेला.
उमेश पाटील म्हणाले, काम करणाऱ्यांच्या पाठीवर प्रदेशाध्यक्ष तुम्ही हात ठेवा. मूल्यांकन बघुनच त्याला मार्क्स द्या. ज्या लोकांना पदे दिली आहेत त्यांचे काऊंटडाऊनसुध्दा व्हायला पाहिजे. कोणाकडे कोणाकडे काय जबाबदाऱ्या होत्या आणि कोणी कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. हे बघायला हवे. काम करण्यामध्ये उमेश पाटील जर नालायक ठरला तर एक वर्षाच्या आत त्याला हाकलून दिले पाहिजे व घरी बस म्हटले पाहिजे. कशाला अध्यक्षपदे अडवून ठेवायची. उमेश पाटील त्या कॅटेगिरीतला नाही. रिझल्ट देऊनच दाखवणार. अशा पध्दतीची आव्हानात्मक तडाखेबाज विधाने करुन उमेश पाटील यांनी शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांच्यावर टीकेची झोड पाटील यांनी उठवली.

संजयमामा शिंदेंच्या उपस्थितीने विस्फारले डोळे
अजित पवार यांच्याकडून त्यांच्या राष्ट्रवादीची करमाळा विधानसभेसाठी संजयमाना शिंदे यांना ऑफर होती. ती शिंदे यांनी धुडकावून लावत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यातून अजित पवार यांची संजयमामा शिंदे यांच्यावर नाराजी आहे, संजयमामा शिंदे हे सोमवारच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्याला उपस्थित होते. या ठिकाणची त्यांची खास उपस्थिती पाहून उपस्थितांपैकी अनेकांचे डोळे विस्फारले. भुवया उंचावल्याचे चित्र दिसले.
उमेश पाटील समर्थक कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज अन् अस्वस्थता
उमेश पाटील यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरन माजी आमदार राजन पाटील यांचा गट नाराजी आहे. या गटाने पर्यायाने लोकनेते परिवारातील समर्थकांनी उमेश पाटील यांच्या निवडीवरुन खुद्द अजित पवारांना टार्गेट करत त्यांच्यावर टिकेची झोड उठवली होती. हे सगळं असं चित्र त्यांच्याबाबतीत असताना सोमवारच्या अजित पवार गटाच्या मेळाव्याला ते आवर्जुन उपस्थित होते. त्यांच्या या उपस्थितीबद्दल उमेश पाटील समर्थकांमध्ये वेगळीच कुजबुज आणि अस्वस्थता असल्याचे लपून राहिले नाही.
संतोष पवारांकडून राजन पाटलांचा ‘जिल्ह्याचे नेते’ म्हणून उल्लेख, रंगली चर्चा
उमेश पाटील यांच्या विरोधात बंडाचे निशान फडकावणाऱ्या संतोष पवार यांची राजन पाटील परिवाराशी जवळीक वाढली आहे. याच प्रत्यय सोमवारच्या मेळाव्यावेळी आला, संतोष पवार यांनी आपल्या भाषणामध्ये राजन पाटील यांच्या नावाचा उल्लेख ‘जिल्ह्याचे नेते’ म्हणून मुद्दामहून केल्याची चर्चा मेळाव्यादरम्यान उपस्थितांमध्ये रंगली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरात येऊन काहींना महापालिकेचे तिकिट देतो, महामंडळावर घेतो, अशा घोषणा करत आहेत. आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आम्हाला शहराची जबाबदारी दिली. पण, शहरातील कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष कशा प्रकारे महापालिकेचे तिकिट देऊ शकतो, महामंडळ कशा प्रकारे देऊ शकतो, असे सवाल पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे नाव न घेता विचारले. ते म्हणाले, जे मेहनत करतात, ते पदाधिकारी प्रचंड डिस्टर्ब झाले आहेत. आम्ही सोलापुरात काम करतो. पण काही लोक प्रदेश पातळीवरून वरिष्ठ पदे आणत आहेत. आम्ही काम करतो, पण आम्हाला प्रमोशन मिळत नाही, अशी धारणा सोलापूर शहरात काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ येऊ शकते. सोलापूर शहरातील कुठल्याही व्यक्तीला प्रवेश द्यायचा असेल अथवा पद द्यायचे असेल तर किमान आम्हाला बोलावा. आम्ही शेजारी उभा राहतो. आपल्या सर्वांना पक्ष वाढवायचा आहे. नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो. प्रदेश पातळीवर घेण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सोलापुरात आल्यानंतर त्यांना पक्षाच्या कार्यालयात बोलावून घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केले, हकालपट्टी केली, अशा लोकांना ते प्रदेशवर घेऊन जाऊन पदं देत आहेत. आम्हाला खूप वाईट वाटतं, जेव्हा आम्हीच हकालपट्टी केलेले लोक पक्षात येऊन मिरवत असतात.
संतोष पवारांच्या खांद्यावर तटकरेंनी ठेवला हात अन् ‘हे’ म्हणाले…
सुनील तटकरे म्हणाले की, पूर्वी पक्षात तुम्हाला जो मान होता, तो आजही असेल, असे सांगून संतोष पवार यांच्या खांद्यावर हात ठेवत तुम्ही काही खंत व्यक्त केली. त्याची योग्य ती नोंद मी घेतली आहे. अलीकडच्या कालावधीत जे पदाधिकारी नेमले आहेत, त्यांचेही मूल्यमापन करेन. लगेच काही वेगळे करेन असं नाही. पण, मूल्यमापन निश्चितपणे करेन, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले, विधानसभेच्या यशानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. माजी आमदार, माजी खासदार, माजी महापौर व इतर प्रमुख नेते राष्ट्रवादीत सहभागी होत आहेत. अल्पसंख्याक समाजालाही राष्ट्रवादीकडून आपले संरक्षण होईल, असा विश्वास वाटत असल्याने तेही आपल्यासोबत मोठ्या संख्येने जोडले जात आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यातील आपल्या पक्षाच्या कार्यकत्यांच्या भावना मी समजून घेतल्या आहेत. अजित पवार यांच्याशी याबद्दल चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.