शरद पवार आणि साठे यांच्या भेटीकडे लागल्या सर्वांच्या नजरा !
दस्तुरखुद्द शरद पवारांनी लावला काकांना फोन बारामतीला येण्याचे दिले आमंत्रण ; काका साठेंची नाराजी होणार का दूर
तर दुसरीकडे नाराज साठेंची आ.बापूंनी घेतली भेट सोलापूरच्या राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना आले उधाण
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१८ जून
सोलापूरच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात एकाच दिवशी बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा दस्तुरखुद्द शरद पवार यांनी आपले जुने सहकारी ज्येष्ठ नेते तथा पूर्वाश्रमीचे जिल्हाध्यक्ष असलेले बळीराम साठे यांना फोन लावून नाराजी दूर करण्यासाठी बारामतीला भेटायला बोलवले आहे. आपल्याला जिल्हाध्यक्ष पदावरून काढल्यानंतर काका साठे हे शरद पवार यांच्यावर तीव्र नाराज झाले होते.
दरम्यान, पक्षाने न विचारताच परस्पर निर्णय घेतल्यानंतर काकांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्ष सोडण्याची भूमिका मांडली होती. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय पक्का केला होता. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. बुधवारी संजय पाटील घाटणेकर यांनी बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्यासमोर सोलापूर जिल्ह्यातील गाऱ्हाणे मांडले. विशेष करून ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांची नाराजी पक्षासाठी योग्य नाही, ते ज्येष्ठ आहेत, त्यांना थांबवावे याबाबत आपण त्यांच्याशी बोलावे अशी विनंती केल्यानंतर या राजकीय घडामोडींना आता वेग आलेला दिसत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा दस्तुरखुद्द शरद पवार यांनी काका साठे यांना फोन लावून बारामतीला भेटायला या असे सांगितले. काका साठे यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही असेही ते म्हणाले असल्याचे घाटणेकर यांनी सांगितले.
तर दुसरीकडे एकाच दिवशी दुसरी घडामोडी घडताना दिसली. बुधवारी सकाळीच राज्याचे माजी सरकार मंत्री तथा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी वडाळ्यामध्ये जाऊन काका साठे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली. याबाबत सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. काहींनी तर बापूंनी काकांना भाजपमध्ये येण्यासाठी आग्रह धरल्याचे बोलले जात आहे. काका साठे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गुरुवारी बारामतीला जाणार असल्याचे समजले. या भेटीनंतर काका साठे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.