लोकसभेला मतांची कडकी ; म्हणून बहीण झाली लाडकी :- खा.डॉ.अमोल कोल्हे
कोल्हेंचा महायुतीवर निशाणा साधला आणि महेश कोठे यांना निवडून देण्याचे केले आवाहन !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१२ नोव्हेंबर
विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचाच कालावधी शिल्लक असून निवडणुकीची रंगत आणखीन वाढत चाललेली आहे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघात भाजप महायुतीचे उमेदवार विजय देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांच्यात जोरदार लढत पहावयास मिळत आहे. निवडणुकीचा मुद्दा उपस्थित करत एकमेकांवर आरोप प्रत्यरोप केले जात आहेत.
दरम्यान दुसरीकडे महेश कोठे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ठिकठिकाणी त्यांना जनतेचा मोठा पाठींबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. यापदयात्रा बरोबरच महेश कोठे यांच्यासाठी शहर उत्तर मध्ये स्टार प्रचारक येत असून विविध भागात स्टार प्रचारकांच्या सभा होत आहेत.
त्याच अनुषंगाने सोमवारी सायंकाळी दमानी नगर आणि पंजाब तालीम परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची महेश कोठे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिलांनी अमोल कोल्हे यांचे औक्षण करून त्यांचे जोरदार स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
लोकसभेला झाली मतांची कडकी म्हणून बहीण झाली लाडकी म्हणत महायुती डॉ. कोल्हे यांनी युती सरकारवर निशाणा साधत, नागरिकांना महेश कोठे यांना मोठया मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले, तसेच खास करून महिलांना लाडकी बहीण योजना का सुरू झाली आणि लाडकी बहीण योजनेमुळे महागाई कशी वाढली याची आठवण करून दिली.