किसन, तुझी प्रार्थना पूर्ण होता होता राहिली… अजित दादांनी लागावले फटके सर्वत्र पिकला हशा
अंतर्गत गटबाजी विसरून एकत्र लढण्याचा दिला सल्ला
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.७ डिसेंबर
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नूतन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास सोलापूर शहरातील नेत्यांनी हजेरी लावली होती. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. हा सत्कार स्वीकारताना अजितदादांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना गट-तट न करता एकत्र काम करण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, महायुती सरकारच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, चेतन गायकवाड यांनी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन अजित पवार यांचा सत्कार केला.
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी अजित पवार यांची निवड व्हावी, म्हणून किसन जाधव यांनी यज्ञ केला होता. जाधव यांचा सत्कार केल्यानंतर अजितदादा म्हणाले, ‘किसन, तू माझ्यासाठी केलेला यज्ञ मी पाहिला; पण तुझी प्रार्थना पूर्ण होता-होता राहिली बघ.’ या शब्दांवर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ‘तुम्ही माझा सत्कार केला. आता सर्व जण एकत्र काम करा. तुम्हाला विकासकामांमध्ये भरघोस मदत होईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आनंद मुस्तारे, महेश निकंबे, माणिक कांबळे, हुलगप्पा शामम, लखन जाधव, आदी उपस्थित होते.