शरद राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची माळ महेश गादेकरांच्या गळ्यात ?
शहराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी प्रभारी हर्षवर्धन पाटील यांची झाली पदाधिकाऱ्यांसमोर बैठक
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.८ नोव्हेंबर
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने त्यांचा विषय संपला आहे. त्यामुळे खरटमल यांच्या विषयावर आता कोणीही, कसलीही चर्चा करू नये, यासंदर्भात संवाद टाळा, यापुढील अध्यक्ष कोण असावा, तुमच्या सर्वांनुमते अध्यक्ष निवड केला जाईल. त्यासाठी पक्षाची पुढील भूमिका काय असावी. या चर्चेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूरचे प्रभारी तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकत्यांशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान नव्या शहराध्यक्षपदासाठी माजी महेश गादेकर यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गादेकर यांच्या नावावर होकार दर्शवला असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंबंधी आज मुंबईत बैठक घेऊन शिक्कामोर्तब करण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष खरटमल यांनी राजीनामा दिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आणि पक्षबांधणीसाठी हर्षवर्धन पाटील हे सोलापुरात आले होते. गांधीनगर परिसरातील हॉटेल लोटस येथे झालेल्या बैठकीत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी वन टू वन संवाद साधून आढावा घेतला. शहराध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे परीक्षण करण्यासाठी ही बैठकअत्यंत महत्त्वाची ठरली.
या बैठकीदरम्यान पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. अध्यक्षपदाच्या पुढील निर्णयाबाबत सविस्तर चर्चा करून त्याचा अहवाल मुंबईत रविवारी होणाऱ्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सादर केला जाणार असल्याचे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. या बैठकीत सोलापुरातील अलीकडच्या घडामोडींसह अध्यक्षपद व पुढील संघटनात्मक बदलांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने बोलताना पाटील म्हणाले, ही निवडणूक महाविकास आघाडीच्या रूपात लढवली, तरच राष्ट्रवादीला अधिक यश मिळेल. राज्यात सध्या महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असून, त्याचा फायदा सोलापुरातही निश्चित मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला माजी महापौर अॅड. यू. एन. बेरिया, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, भारत जाधव, जनार्दन कारमपुरी, मनोहर सपाटे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील, सरचिटणीस दिनेश शिंदे, चंद्रकांत पवार, प्रशांत बाबर, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता रोटे, बिस्मिल्ला शिकलगार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.