राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी साजरी केली राखी पौर्णिमा….नव्वदीच्या लाडक्या बहिणीकडून बांधली राखी

शरद पवारांनी सोलापूरातील नव्वदीच्या लाडक्या बहिणीकडून बांधली राखी

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि ११ ऑगस्ट – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार हे रविवारी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात शेतकरी संवाद मेळाव्यात उपस्थित होते. मेळावा संपल्यानंतर शरद पवारांनी बार्शीच्या माजी आमदार प्रभावती झाडबुके यांची भेट घेतली. त्यावेळी झाडबुके यांनी शरद पवार यांना राखी बांधल्याने राजकीय वर्तुळात असा भाऊ प्रत्येकाला मिळावा अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

          दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेची तरतूद केली आहे. योजनेनुसार पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे. निवडणुकीच्या धुराळ्यात लाडकी बहिणीची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच रविवारी सोलापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांना त्यांच्या लाडक्या बहिणीने राखी बांधली.

      एकेकाळी बार्शी विधानसभेचे नेतृत्व केलेल्या प्रभावती झाडबुके या नव्वद वर्षांच्या झाल्या आहेत. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार यांनी झाडबुके यांची भेट घेतली. नव्वद वर्षाच्या प्रभावती झाडबुके यांनी शरद पवार यांना राखी बांधून कर्तव्य बजावले. यानिमित्ताने शरद पवार आणि माजी आमदार प्रभावती झाडबुके यांच्यातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

असा भाऊ प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळावा, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा….

महाराष्ट्रातल्या करोडो स्वाभिमानी कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शरद पवारानी त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये जमेल तेव्हा हातभार लावला. मराठी माणसाच्या कुटुंबाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा नेहमीच प्रयत्न केला. अशा करोडो बहिणींचा लाडका भाऊ, आज पुन्हा आपल्या बहिणीला आठवणीने भेटायला बार्शीत आला होता. असा हा भाऊ देशातील प्रत्येक बहिणीला मिळावा, अशी चर्चा राष्ट्रवादीचे नेते करत होते.

शरद पवार यांचा बार्शीत शेतकरी मेळावा संपन्न…..

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरू असताना इकडे शरद पवार यांचा शेतकरी संवाद मेळावा सोलापूरच्या बार्शी येथे पार पडला. या मेळाव्यात शेतकरी हमीभावाचा प्रश्न, शेतकऱ्यांपुढील अडचणी यावरून सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या शेतकरी धोरणांचा पवार यांनी समाचार घेतला. तत्पूर्वी बार्शीत येत असताना बार्शी कुर्डूवाडी रस्त्यावर मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवून आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा, अशी विनंती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *