ध्येय उद्दिष्टे ठराव राहिला बाजूला, इतिहास रंगवण्यात नेते झाले व्यस्त….

सोलापूर व्हिजन
सोलापूर.दि १२ ऑगस्ट – देशाचे नेते एकाच व्यासपीठावर विराजमान झाले होते. शरदचंद्र पवार आणि सुशील कुमार शिंदे निमित्त होते भटक्या विमुक्तांच्या कार्यकर्ता मेळाव्याचे…. सदरच्या मेळाव्यात भटक्यांचे समस्या मांडून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे असताना नेतेमंडळी इतिहास रंगवण्यातच व्यस्त झाल्याचे दिसून आले.

संबंध राज्यभरातून कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार होते. मात्र हा मेळावा भटक्यांचा आहे की राष्ट्रवादीचा हेच कोणाला उमगले नाही..मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते यांचीच गर्दी दिसून आली. भटके विमुक्त जातीचे विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. परंतु नेते मंडळी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यातच रमून गेलेले दिसले.
वास्तविक पाहता भटके विमुक्त जातीतील अनेक समाज अजूनही दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहे. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, विविध धेय्य उद्दिष्टे ठरवून त्यांवर ठराव संमत करणे , वरिष्ठ नेत्यांच्या पुढाकारातून मागासलेल्या वर्गातील न्याय हककांसाठी आग्रही भूमिका घेणे हे अपेक्षित असताना तसे झालेले दिसत नाही.
शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या समोर समाजाच्या गाऱ्हाणी मांडून केवळ व्हिवळत बसण्याने काही साध्य होणार नाही. आगामी काळात भटके विमुक्त जमातीसाठी कल्याणकारी योजनांची आखणी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. मात्र राज्यातील संघटना आणि स्थानिक नेते आपलाच कित्ता गिरविण्यात व्यग्र आहेत. हीच एक मोठी शोकांतिका पहावयास मिळते आहे.
मेळाव्यात नेमके काय अपेक्षित…..
-राज्याच्या मेळाव्यात अनेक समस्यांचा ऊहापोह करणे आवश्यक होते.
-विविध प्रलंबित समस्यांवर उपाय योजना करण्यासंबंधी सूचना केल्या पाहिजे होत्या.
-भटके विमुक्त जातीना एससी. एसटी. प्रर्वगामध्ये समाविष्ट करण्यात यावे ही प्रमुख मागणी असताना यासंबंधी ठोस निर्णय किंवा ठराव संमत करण्यात आला नाही.
-आगामी काळात संघटनेचे ध्येय आणि धोरणे आखून त्यावर शिक्कामोर्तब करणे आवश्यक होते.
नेत्यांनी वरिष्ठ स्तरावर बोट दाखवत झटकले हात…
एकाच व्यासपीठावर देशाचे दोन्ही नेते एकत्रित आले असता त्या समस्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असताना केंद्र सरकारकडे बोट दाखवत नेत्यांनी आपले हात झटकले आहेत. तारेच्या कुंपण्याच्या मानसिकतेतून नेते मंडळी अद्यापही बाहेर पडत नसल्याने विकास कसा साध्य होईल असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.