श्रीरुपाभवानीसह इतर पाच प्रमुख मंदिरांतही परंपरेनुसार झाली घटस्थापना…

शारदीय नवरात्र महोत्सवास भक्तिमय वातावरणात झाला प्रारंभ..

श्रीरुपाभवानीसह इतर पाच प्रमुख मंदिरांतही परंपरेनुसार झाली घटस्थापना…!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.०३ ऑक्टोंबर – आई राजा उदे उदे…..चा गजर, लेझीमचा मर्दानी बहारदार खेळ,  गुलालाची मुक्त उधळण, डौलाने फडकणारे भगवे ध्वज अशा उत्साही आणि भक्तिमय वातावरणात वाजत गाजत मिरवणुका काढून सोलापूर शहर व परिसरात सार्वजनिक शक्तिदेवी उत्सव मंडळांनी शक्तिदेवी मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

        तत्पूर्वी सकाळी घटस्थापनेच्या दिवशी शहरात सुमारे ४०० सार्वजनिक मंडळांनी शक्तिदेवीची प्रतिष्ठापना केली.तर सुमारे १८५  मंडळांनी शक्तीदेवीची वाजगाजत मिरवणूक काढली. मानाच्या श्री रूपाभवानी मंदिरात दुपारी घटस्थापनेने नवरात्र उत्सवात प्रारंभ झाला. तसेच भावसार समाजाची कुलदेवता श्री हिगुलांबिका माता, उत्तर कसब्यातील श्री कालिकादेवी माता, लाड तेली समाजाची श्री जगदंबा माता, गोंधळी समाजाची श्री इंद्रभवानी माता आदी विविध शक्तिदेवींच्या मूर्तीची पारंपरिक पध्दतीने प्रतिष्ठापना करण्यात आली.  घरोघरी घटस्थापनेचे विधी दुपारी दीड वाजेपर्यंत करण्यात आले. यावेळी सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसून आले.

     दरम्यान सकाळी ११ वाजल्या पासून बाळीवेस शक्तीदेवी पूजा मंडळ मिरवणुकीला प्रारंभ झाला. शिवाजी चौक, बाळी वेस, नवी पेठ, माणिक चौक, पूर्व भाग आदी ठिकाणी मिरवणुकांनी रस्ते फुलून गेले होते. बाळीवेस शक्तिदेवी मंडळाची मर्दानी बहारदार लेझीम खेळाने मिरवणूक जल्लोषात निघाली. भव्य लेझीम पथक, बलजोडया लक्षवेधी ठरल्या. तर भवानी पेठ येथील देवी  मंडळाच्या लेझीम पथकाने एकापेक्षा एक सरस डाव सादर करून नागरिकांचे लक्षवेधून घेतले. नव्यापेठेतील शक्तिपूजा मंडळाच्या मिरवणुका उत्साही वातावरणात पार पडल्या.

ग्रामदेवी श्रीरुपाभवानीसह पाच प्रमुख मंदिरांतही घटस्थापना…

ग्रामदेवी श्रीरुपाभवानी मंदिरात पहाटे चार वाजता प्रक्षाळपूजा झाली. सकाळी साडेअकरा वाजता ट्रस्टी वहिवाटदार मल्लिनाथ मसरे यांनी देवीची आरती करुन घटस्थापना केली. यावेळी मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदी यांच्यासहभक्तगण, मानकरी, पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश पेठेतील भावसार समाजाची कुलस्वामिनी हिंगुलांबिका देवी मंदिरात हिंदू धर्म रुढी-परंपरेने पहाटे पाच वाजता गाभार्‍याचा दरवाजा उघडण्यात आला. सकाळी सहापर्यंत मंत्रपुष्पांजलीने अंबादास सुलाखे यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करण्यात आला. वस्त्र परिधान करून सुवर्ण अलंकार, पुष्पहार अर्पण करून भाविकांना दर्शनासाठी दरवाजा उघडला. सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत विविध धार्मिक विधीने जय हिंगलाज मातेच्या जयघोषात घटस्थापना करून आरती करण्यात आली. रविवार पेठेतील इंद्रभवानी देवी मंदिरातही संबळ अन् झांज पथकाच्या गजरात महाआरती करुन घटस्थापना करण्यात आली. शिवलाड तेली समाजाच्या अंबाबाई आणि जगदंबा यादोन देवीच्या गाभार्‍यात घटस्थापना झाली. अंबाबाई ट्रस्टच्यावतीने प्रवीणचंद्र उळागड्डे यांच्या हस्ते घटस्थापना झाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *