शहरात नवरात्रोत्सवाची लगबग…
ग्रामदेवता श्रीरूपाभवानी मंदिर परिसरात मंडप उभारण्यास सुरुवात…!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २२ सप्टेंबर – अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रौत्सव दृष्टीक्षेपात आला आहे. याच नवरात्रोत्सवच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराची ग्रामदेवता असणाऱ्या श्रीरूपाभवानी माता मंदिर परिसरात नवरात्रोत्सवा निमित्त भव्यदिव्य सभा मंडप उभारण्याची लगबग सुरू झाली आहे. शहरातील शेकडो देवीभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरुपाभवानी माता मंदिरात नवरात्र उत्सव काळात अबालवृद्ध भाविकांची मोठी मांदियाळी असते.
” आई राजा उदो उदो सदानंदाचा उदो उदो बोल तुळजाभवानी माता की जय ” मातेचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक पायी येतात. या भाविकांचे ऊन्ह , वारा , पाऊस यांपासून संरक्षण व्हावे, तसेच मातेच्या मंदिरात प्रवेश करताच भाविकांना दर्शन रांगेत उभे राहावे लागते. यासाठी मंदिर परिसरात डुम प्रकारचे भव्य असे मंडप उभारले जात आहे. ६० बाय ९० अशा आकाराचे हे डुम आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. लोखंडी अँगलच्या माध्यमातून उभारलेल्या मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यावर पांढरा शुभ्र पडदा लावण्यात येणार आहे.
दरम्यान त्याचप्रमाणे श्रीरूपाभवानी मातेच्या मंदिराच्या दोन्ही बाजूस ३० बाय १०५ आकाराचे सभा मंडप उभारले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात देखील लोखंडी अँगल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मंडप उभारले जात आहे. तसेच श्रीरूपाभवानी चौक परिसरात सुद्धा चार कमानी उभारल्या जाणार आहेत. नवरात्रोत्सव काळात मातेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील येथे पोलिसांसाठी एक कक्ष उभारला जाणार आहे. सी.सी. टी. व्हीं कॅमेरा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी हा मोठ्या आकाराचा मंडप सहाय्यक ठरत आहे. नवरात्र उत्सव काळात मंदिर परिसरात कायमच भाविकांची गर्दी असते.
कोजागिरी पौर्णिमेला देखील महिलांसह अबालवृद्ध भाविकांची विशेष उपस्थिती असते. महिला भाविक देवीची खणा नारळने ओटी भरतात. तसेच परडी भरून मातेचे आशीर्वाद घेतात. नवरात्र उत्सव काळात श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी असंख्य भाविक पायी तुळजापूरला जातात. तेव्हा ग्रामदेवता श्रीरूपाभवानी मातेच्या मंदिरात मातेचे दर्शन घेऊनच पायवाट सुरू करतात.
श्रीरूपाभवानी मातेच्या चरणी आगळीवेगळी सेवा अर्पण.
सचिन मंडप कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून डूम हा मंडप उभारण्यात येतोय. भाविकांना मातेचे दर्शन घेण्यासाठी तासनतास दर्शन रांगेत उभे राहावे लागते. तेव्हा देवी भक्तांना ऊन्ह, वारा, पाऊस यांपासून संरक्षण मिळावे. यासाठी डूम हा मंडप उभारून श्रीरूपा भवानी मातेच्या चरणी आगळीवेगळी सेवा अर्पण केली जात आहे.
नवरात्र उत्सव काळात भव्य मंडप उभारण्याचे काम.
नवरात्र उत्सव काळात सोलापूर शहरातील तसेच इतर जिल्ह्यातील देवी भाविकांची मंदिरात मोठी गर्दी असते. याभाविकांना दर्शन रांगेत उभे राहावे लागते. याच अनुषंगाने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील मंदिर परिसरात भव्य मंडप उभारले जात आहे. यासाठी सुमारे १२ कामगार कार्यरत आहेत. लोखंडी रॉड, अँगल्स आणि पडदा लावून भाविकांसाठी भव्य सभा मंडप आणि डूम उभारले जात आहे.
– प्रशांत आट्टे , व्यवस्थापक सचिन मंडप कॉन्ट्रॅक्टर.