आई राजा उदो उदो….सदानंदाचा उदो उदो… घुमला सर्वत्र जयघोष..!

शहरात घटस्थापना निमित्त आदिशक्तीचा जागर ; पारंपारिक लेझीम मिरवणूकीने वेधले लक्ष….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.०३ ऑक्टोंबर – आई राजा उदो उदो……. सदानंदाचा उदो उदो बोल श्रीतुळजाभवानी मातेचा की जय…. श्रीरूपाभवानी माता की जय…….! या जयघोषणांनी अवघा परिसर दणाणून सोडला. निमित्त होते, सोलापूर शहरातील घटस्थापना मिरवणूकीचे…! संबळ, हलगीचा कडकडाट, पारंपारिक वेशभूषा,लेझीम, ढोल ताशांचा गजर,भगवे ध्वज अन् गुलालाची मुक्त उधळण असे चित्र शहरात दिसून आले.
अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या श्रीतुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवाची घटस्थापना करून शहरात शारदीय नवरात्रौत्सवास आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. गुरुवारी सकाळी देवीभक्तांच्या घरोघरी सकाळी विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर पूजा संपन्न झाली. तद्नंतर दुपारी शहरात सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या शक्तीदेवींच्या मिरवणूकीस मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सुरुवात झाली. पारंपारिक वेशभूषा साकारून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी देवी मातेच्या स्वागतासाठी ढोल ताशांच्या गजरात लेझीमचे आकर्षक पैत्रे सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले.
दरम्यान शहरातील बाळीवेस चौक, टिळक चौक, मधला मारुती चौक, भवानी पेठ, बलिदान चौक, विश्रांती चौक, रुपा भवानी चौक, परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात निघालेली लेझीम पथकाची मिरवणूक पाहण्यासाठी अबालवृद्ध भाविकांची मोठी मांदियाळी रस्त्यांच्या दुतर्फा होती.
यावेळी विविध नाविन्यपूर्ण दागिन्यांनी अलंकृत केलेली आदिमाया आदिशक्ती देवी मातेची सौंदर्यपूर्ण मूर्ती आकर्षक सजावट केलेल्या रथात विराजित करण्यात आली होती. त्यापुढे पारंपारिक लेझीम आणि मर्दानी खेळ सादर करण्यात आले. शहरातील मिरवणूक मार्गावर हे दृश्य पहावयास मिळाले. यावेळी जगदंबेचा जय जय जयकार करत नवरात्रौत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या आनंद साजरा केला. यावेळी मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

परराज्यातील देवीभक्तांनी देवी मातेचा जयघोष करत घेऊन नेली भवानीज्योत…
सोलापूर शहर जिल्ह्यासह परराज्यातील विविध सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे भवानी ज्योत प्रज्वलित केली. त्यानंतर सदरची भवानीज्योत तुळजापूरहून पायी आणण्यात आली.
शहरात श्रीरुपाभवानी मंदिर येथे देवीचे दर्शन घेऊन, आई राजा उदो, उदो….. सदानंदाचा उदो, उदो….. बोल श्रीतुळजाभवानी माता की जय…! या निनादात परराज्यातील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावाची वाट धरली.
मिरवणूकीत डॉल्बीला फाटा.
यंदाच्या शारदीय नवरात्रौत्सव मिरवणूकीत विविध सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाने मिरवणूकीत डॉल्बीला फाटा देत पारंपारिकतेला प्राधान्यक्रम देताना दिसून आले. पारंपारिक वेशभूषा, संबळ, हलगी, ढोल-ताशा, लेझीम पथक, यांमुळे शिस्तबध्द पध्दतीने मिरवणूक पाहण्यासाठी देवीभक्तांची मिरवणूक मार्गावर गर्दी दिसून आली.
शिखर पहारिया यांची विशेष उपस्थिती…
सोलापूर शहरातील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या मिरवणूकीस सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारिया यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी शक्तीदेवी मूर्तीची पूजा त्यांच्याहस्ते करण्यात आली. त्यानंतर त्यांनी काहीकाळ लेझीम पथकात सहभागी झाल्याचे दिसून आले.
विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा आणि श्रीकृष्ण सुदर्शन चक्र लक्षवेधी..
आदिमाया आदिशक्ती देवी मातेची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावेळी मिरवणूकीत देवी मातेस सौंदर्यपूर्ण भरजरी पैठणी साडी परिधान करण्यात आली होती. वारद चाळ नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या वतीने श्रीविठ्ठलाची प्रतिमा साकारण्यात आली होती. त्याचप्रमाणे गणराज तरुण मंडळ नवरात्र महोत्सव एन.जी. मिल चाळ यांच्या वतीने देखील द्वारकाधीश रूपातील श्री कृष्ण आणि फिरते सुदर्शन चक्र देखावा सादर करण्यात आला होता. सदरचा फिरता देखावा लक्षवेधी ठरला.