नागपंचमी निमित्त बाजारपेठ सजली  ; नवीपेठेत मेहंदी काढण्यासाठी मुलींची गर्दी

नागपंचमी निमित्त बाजारपेठ सजली  ;  पंचमीचे साहित्य घेण्यासाठी महिलांसह मुलींची झाली गर्दी…

प्रासादिक साहित्यांसह शृंगाराची साधने घेण्याकडे कल 

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि ८ ऑगस्ट – नागपंचमी सण शहरात उद्या मोठा उत्साहात साजरा होणार आहे. याच नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या मधला मारुती, टिळक चौक, कोंतम चौक या बाजारपेठा विविध प्रासादिक साहित्य आणि लाह्यांनी सजून गेलेले दिसत आहे.

        हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यातील विविध सण महत्त्वाचे मानले जातात. श्रावण महिन्यापासूनच विविध सणांना खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. त्यातील पहिला सण म्हणून नागपंचमी सणाकडे पाहिले जाते. महिलांसाठी नागपंचमी सण एक पर्वणी देणारा सण असतो. या दिवशी नागदेवताला लाह्या आणि दूध अर्पण केले जाते.नागपंचमी सणामध्ये या लाह्याला विशेष असे महत्त्व आहे. त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील विविध महत्त्वांच्या बाजारपेठांमध्ये प्रासादिक साहित्य तसेच लाह्या विक्रीसाठी दाखल झालेले आहेत.

        गेल्या महिन्याभरापासून कारागीर ज्वारीपासून लाह्या बनवण्यात व्यस्त आहेत. शुक्रवार पेठ इथल्या भुई गल्लीमध्ये कारागीर लाह्या बनवत असतात. ठोकदरामध्ये लाह्या विक्री केल्यानंतर किरकोळ विक्रेते बाजारपेठेत विक्रीसाठी लाह्या आणतात. त्या अनुषंगाने नागरिकांची विविध खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी दिसून आली.

नागपंचमी सणाच्या निमित्ताने महिलांची बाजारपेठेत वर्दळ

नागपंचमी सण हा महिलांचा प्रमुख सण मानला जातो. विशेष करून महिला वर्गांची बाजारपेठेत मोठी वर्दळ होती. मेहंदीचा कोन तसेच विविध साज शृंगारचे साहित्य घेण्यासाठी महिला आणि मुली बाजारपेठेत दाखल झाल्या होत्या. सणानिमित्त लागणारे विविध प्रासादिक साहित्य आणि नागपंचमी सणाचे चित्र घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला. याच चित्रांद्वारे महिला घरामध्ये नागपंचमी सणाची पूजा संपन्न करत असतात.

– प्रिया पाटील, महिला ग्राहक 

नववधू आणि लग्न ठरलेल्या मुलीसाठी शृंगराची साधने घेण्याकडे महिलांचा कल….

नागपंचमी सणानिमित्त बाजारपेठेत अनेक प्रकारची साज शृंगराची साधने उपलब्ध झाली आहेत. लग्न झालेल्या नववधूचा पहिला नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नववधूला नागपंचमीचा साज शृंगराचा पूर्ण सट भेट दिला जातो. तसेच ज्या मुलींचा साखरपुडा झाला असेल त्या मुलीला देखील हा शृंगाराचा संपूर्ण सट सासरच्या मंडळीकडून भेट स्वरूपात दिला जातो. त्या पार्श्वभूमीवर शृंगाराचे साहित्य घेण्यासाठी महिलांची बाजारपेठेत विशेष करून महिलांच्या सौंदर्यप्रसाधने दुकानात गर्दी दिसून आली. तसेच हातावर मेहंदी काढण्यासाठी देखील नवीपेठेत मुली आणि महिलांची गर्दी दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *